बार्सिलोना संघ कठीण परिस्थितीत असताना प्रत्येक वेळी स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी त्यांच्या मदतीला धावून आला आहे. रिअल बेटिसविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यातही त्याचा प्रत्यय आला. जेतेपदाच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या बार्सिलोनाला मेस्सीनेच तारले. दुसऱ्या सत्रात मैदानात अवतरल्यानंतर ११ मिनिटांच्या फरकाने दोन गोल झळकावून मेस्सी बार्सिलोनाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मेस्सीच्या सुरेख कामगिरीमुळे बार्सिलोनाने रिअल बेटिसवर ४-२ असा विजय मिळवला. मेस्सीने बार्सिलोनाला स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदाच्या उंबरठय़ावर आणून ठेवले आहे.
डोर्लान पाबोन आणि रुबेन पेरेझ यांनी पहिल्या सत्रात दोन गोल करून पाहुण्या रिअल बेटिस संघाला आघाडीवर आणून ठेवले. मात्र अ‍ॅलेक्सी सान्चेझच्या गोलमुळे बार्सिलोनाने पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या सत्रात डेव्हिड व्हिला याने ५६व्या मिनिटाला गोल करून बार्सिलोनाला २-२ अशी बरोबरी साधून दिली.
मेस्सी मैदानात अवतरल्यानंतर तिसऱ्याच मिनिटाला त्याने बार्सिलोनाच्या खात्यात गोलाची भर घातली. ५९व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री-किकवर मेस्सीने बेटिसचा गोलरक्षक एड्रियनला चकवत डाव्या बाजूने चेंडू गोलजाळ्यात ढकलला. या गोलमुळे स्पॅनिश लीग स्पर्धेच्या सलग २१ सामन्यांत गोल झळकावण्याची करामत मेस्सीने साधली. सान्चेझ आणि आन्द्रेस इनियेस्टा यांनी आक्रमक चाल रचत बेटिसच्या गोलक्षेत्रात प्रवेश मिळवला. त्यांच्या सुरेख कामगिरीवर कळस चढवण्याचे काम मेस्सीने केले. ७०व्या मिनिटाला मेस्सीने दुसरा गोल लगावला. त्यानंतर दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्यामुळे बार्सिलोनाने ४-२ असा हा सामना जिंकला.