सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एन. श्रीनिवासन यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर विराजमान होण्याची परवानगी दिली आहे. याचप्रमाणे आयपीएलच्या सहाव्या मोसमात झालेल्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी तपास करण्याकरिता नवी चौकशी समिती नेमली आहे.
‘‘श्रीनिवासन आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारू शकतील. परंतु त्यांना स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी नवी चौकशी समिती स्थापन करणे बंधनकारक असेल,’’ असे न्या. ए. के. पटनायक यांनी सांगितले. या खटल्याची सुनावणी पटनायक आणि जे. एस. केहर यांच्या खंडपीठाने केली. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे मालक राज कुंद्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती मुकुल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मुदगल यांच्यासह वरिष्ठ वकील निलय दत्ता आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एल. नागेश्वर राव यांचा त्रिसदस्यीय समितीत समावेश असेल. न्यायालयाने या समितीला पुढील चार महिन्यांत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचप्रमाणे बीसीसीआयला या अहवालावर प्रभाव दाखवू नये वा चौकशीदरम्यान ढवळाढवळ करू नये, अशा सूचना केल्या आहेत. याचप्रमाणे बीसीसीआयचे प्रमुख एन. श्रीनिवासन यांना या चौकशी समितीला सहकार्य करण्याचे आणि त्यापासून दूर राहण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
६८ वर्षीय श्रीनिवासन यांनी २९ सप्टेंबरला बीसीसीआयच्या निवडणुकीत सलग तिसऱ्या वर्षी अध्यक्षपदावर दावा केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे त्यांना अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारता आली नव्हती. परंतु आता त्यांचा मार्ग मोकळा झाला आह़े
श्रीनिवासन यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यापासून रोखण्याकरिता बीसीसीआयची मान्यता नसलेल्या बिहार क्रिकेट असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

आनंद गगनात मावेना!
नवी दिल्ली : एन. श्रीनिवासन यांना अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे ते अतिशय आनंदात होते. क्रिकेट मंडळाचा कारभार चालवण्यासाठी कुणाची तरी आवश्यकता होती, असे श्रीनिवासन यांनी यावेळी सांगितले. ‘‘सर्वोच्च न्यायालयाने मला पदावर पुन्हा रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे,’’ असे श्रीनिवासन यांनी सांगितले.

‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचा आणि निर्णयाचा आम्ही नेहमीच आदर करतो. न्यायव्यवस्थेवर आमचा संपूर्ण विश्वास आहे. एन. श्रीनिवासन आपली अध्यक्षपदाची जबाबदारी आता सांभाळू शकतील, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.’’
        संजय पटेल, बीसीसीआयचे सचिव

‘‘श्रीनिवासन यांच्याबाबतचा निर्णय बीसीसीआयसाठी दिलासादायक आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते निर्विवाद  निवडून आले आहेत. कारण त्यांच्या प्रशासनावर सदस्यांचा विश्वास आहे.’’
    अनुराग ठाकूर, बीसीसीआयचे संयुक्त सचिव

Story img Loader