नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील (एआयएफएफ) प्रशासकीय समितीचा कारभार संपुष्टात आणण्याचा आणि पूर्वनियोजित निवडणूक एक आठवडय़ाने पुढे ढकलण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.
‘फिफा’कडून झालेली निलंबनाची कारवाई आणि पर्यायाने गमावलेले कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रविवारी ‘एआयएफएफ’वर नियुक्त प्रशासकीय समिती हटविण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. ‘फिफा’शी झालेल्या चर्चेच्या फेऱ्यांनंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता. ‘फिफा’ने केलेल्या कारवाईनंतर १७ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सरकारला सक्रिय लक्ष घालण्यास सांगितले होते.
या संदर्भात न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने महासंघावरील बंदी आणि कुमारी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एआर दवे यांच्या अध्यक्षतेखालील तीनसदस्यीय समिती हटवण्याचा आदेश दिले. ‘एआयएफएफ’चा कारभार आता हंगामी सचिव पाहणार आहेत. याचप्रमाणे त्यांनी २८ ऑगस्ट रोजी होणारी निवडणूकही एका आठवडय़ाने पुढे ढकलण्याचा निर्णय दिला. निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
‘‘कुमारी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद गमावणे योग्य ठरणार नाही. क्रिकेट आणि विश्वचषकाचे सामने न्यायलयाच्या आदेशामुळे गमवावे लागल्यास प्रत्येक जण न्यायालयास लक्ष्य करतील आणि यांच्यामुळेच हे सारे घडले असे म्हणतील. म्हणूनच केवळ कुमारी विश्वचषक स्पर्धेचे यजमान राखण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला,’’ असेही सर्वोच्च न्यायलयाच्या खंडपीठाने म्हटले आहे.
‘एआयएफएफ’च्या निवडणुकीत आता ‘फिफा’च्या कार्यप्रणालीनुसार ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींचाच समावेश असेल, असेही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
हॉकी : नायक निवडणूक निर्णयाधिकारी
हॉकी इंडिया संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेनेही वेग घेतला आहे. बिहारचे माजी निवडणूक अधिकारी अजय नायक यांची यासाठी निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एके मजुमदार हे साहाय्यक अधिकारी असतील. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) हंगामी अध्यक्ष सैफ महम्मद, मुख्य कार्यकारी अधिकारी थिएरी वेईल आणि प्रशासकीय समितीचे सदस्य न्यायमूर्ती अनिल आर. दवे, एस. वाय. कुरेशी, झफर इक्बाल यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘एफआयएच’ प्रशासकीय समितीला त्रयस्थ पक्ष मानत नसल्यामुळे हॉकी इंडियाला सर्वात मोठा दिलासा मिळाला होता.
भविष्यात खेळाडूंना मताधिकार मिळावा -भुतिया
‘एआयएफएफ’वरील निलंबन हटवण्यासाठी आणि कुमारी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद राखण्यासाठी प्रशासकीय समिती हटवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे माजी कर्णधार बायचुंग भुतियाने स्वागत केले. त्याच वेळी निवडणुकीतून खेळाडूंचा मताधिकार काढून घेतल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. ‘एआयएफएफ’ची घटना जेव्हा बदलण्यात येईल, तेव्हा खेळाडूंना मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी आम्ही केंद्र शासन, महासंघ आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे पाठपुरावा करू, असेही भुतिया म्हणाला.
नवी कार्यकारिणी
‘फिफा’च्या अटीनुसार निवडणूक घेण्याचा आदेश काढल्यामुळे आता नवी कार्यकारिणी २३ सदस्यीय असेल. यात सहा प्रमुख खेळाडूंचा समावेश असेल. यात चार पुरुष आणि दोन महिला खेळाडूंचा समावेश असेल.