सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
प्रीमिअर बॅडिमटन लीग स्पर्धेच्या आयोजनाला स्थगिती देण्याचा मेघालय उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. या निर्णयामुळे लीगच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे प्रीमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धेचे संयोजक असलेल्या भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
६ डिसेंबरला दिल्लीत झालेल्या लीगच्या फ्रँचायझींच्या बैठकीच्या वैधतेसंदर्भात सोभागया मीडिया प्रायव्हेट लिमिटेड संस्थेने मेघालय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने प्रीमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धेच्या आयोजनाला स्थगिती देण्याचा निर्णय दिला होता. यानंतर तात्काळ भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. स्पर्धेच्या आयोजनाची मान्यता मिळावी अशी विनंती भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयाला केली. सर्वोच्च न्यायालयाने भारतीय बॅडमिंटन असोसिएशनच्या बाजूने निकाल देताना लीगच्या आयोजनाला हिरवा कंदील दिला.
२०१३मध्ये इंडियन बॅडमिंटन लीग या नावाने आयोजित स्पर्धेचे नामकरण आता प्रीमिअर बॅडमिंटन लीग असे झाले असून, २ जानेवारीला मुंबईत स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतासह अन्य देशातले अव्वल बॅडमिंटनपटू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेची अंतिम लढत १७ जानेवारीला नवी दिल्ली येथे होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा