गतवर्षी आयपीएलच्या सहाव्या पर्वात झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्याची पुढील चौकशी करण्यात यावी, अशी शिफारस सट्टेबाजी आणि मॅच-फिक्सिंगसंदर्भात चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने केली आहे. या सामन्यासंदर्भात भारताचा ‘महत्त्वाचा’ खेळाडू, गुरुनाथ मयप्पन आणि हॉटेल व्यावसायिक विक्रम अगरवाल यांच्यात बैठक झाल्याचा हवाला तामिळनाडू पोलिसांनी दिला होता.
न्यायमूर्ती मुदगल यांचा अहवाल सोमवारी सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आला. चेन्नई सुपर किंग्जचे संघ प्रमुख मयप्पन यांनी विंदू दारा सिंग यांच्याकडे या सामन्यात १३०-१४० धावा होतील, असा दावा केला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने १४१ धावा केल्या होत्या. या समितीने ‘महत्त्वपूर्ण’ खेळाडूचे नाव उघड केले नाही.
मयप्पनला संघाच्या प्रशासनात महत्त्वाचे स्थान असल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जची महत्त्वाची माहिती, संघाची व्यूहरचना, वातावरण, इत्यादी गोष्टींची इत्यंभूत माहिती असायची. सध्या उपलब्ध असलेल्या महितीनुसार १२ मे रोजी जयपूरला झालेल्या चेन्नई विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याची पुढील चौकशी होणे आवश्यक आहे, असे समितीला वाटते आहे.
उत्तम जैन ऊर्फ किट्टीने चेन्नई पोलिसांना दिलेल्या जबानीत २७ एप्रिलच्या सामन्यासंदर्भात वाटाघाटी झाल्या होत्या. यात एक महत्त्वाचा भारतीय खेळाडू, मयप्पन आणि विक्रम अगमरवाल सामील होता, असे म्हटले होते.