भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाच्या दिशेने एन. श्रीनिवासन यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एक पाऊल पुढे पडले आहे. श्रीनिवासन यांच्या विरोधात क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहार (कॅब)ने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात, त्याचबरोबर ते बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेलाही उपस्थित राहू शकतात, पण निवडणूक जिंकून आल्यावर मात्र त्यांना जोपर्यंत खटला चालू आहे, तोपर्यंत पदभार स्वीकारता येणार नाही, असे म्हटले आहे. त्यानुसार श्रीनिवासन यांना निवडणूक लढवण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली असून, त्यांनीही आपण निवडणूक लढवणारच, असे ठामपणे सांगितले आहे.
श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येऊ नये, यासाठी कॅबने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन हे निवडणूक लढवू शकतात, पण पदभार स्वीकारू शकत नाहीत, असा निर्णय दिला.
‘‘श्रीनिवासन हे जर अध्यक्षपदी निवडून आले तर ते सर्वोच्च न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत पदभार स्वीकारू शकत नाहीत,’’ असे न्यायाधीश ए. के. पाटनायक आणि जे. एस. केहर यांच्या पीठाने सांगितले.
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात जावई गुरुनाथ मयप्पनवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असले तरी श्रीनिवासन हे अध्यक्षपदाचा पदभार कसा सांभाळू शकतात, असा सवालही या वेळी सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा