* क्रिकेट हा देशात धर्म मानला जातो. त्यामुळे क्रिकेट पुन्हा सभ्य स्वरूपात असायला हवे. जर तुम्ही या गोष्टींना थारा द्याल, तर तुम्ही क्रिकेटला नष्ट कराल!
* क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ म्हणून टिकायला हवा आणि त्याच्यातील सच्चेपणा जपायला हवा!
* निर्णयातील साशंकतेचा फायदा हा खेळाला मिळायला हवा, कुणालाही वैयक्तिकपणे मिळायला नको!
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावर पुन्हा विराजमान होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या एन. श्रीनिवासन यांना सर्वोच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांमुळे सोमवारी धक्का बसला. हितसंबंधांमुळे श्रीनिवासन यांना बीसीसीआयचे प्रमुखपद सांभाळता येणार नाही. त्यांच्या मालकीच्या आयपीएल संघाचा अधिकारी सट्टेबाजी प्रकरणात गुंतला आहे. तसेच बीसीसीआयने क्रिकेटचा त्रिफळा उडवला असून, त्यामुळे खेळ नष्ट होईल, असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने सुनावले.
चेन्नई सुपर किंग्जचा टीम प्रिन्सिपल असलेला गुरुनाथ मयप्पन हा श्रीनिवासन यांचा जावई आहे. हे प्रकरण गंभीर असून, त्याकडे डोळेझाक करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आयपीएलच्या सहाव्या हंगामातील सट्टेबाजी आणि स्पॉट-फिक्सिंग प्रकरणांच्या पाश्र्वभूमीवर गतवर्षी जून महिन्यात श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते. सर्वोच्च न्यायालयाने ‘क्लीन चीट’ दिल्यानंतर अध्यक्षपद पुन्हा मिळावे, यासाठी त्यांनी याचिका दाखल केली होती.
‘‘स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणात तुमचा समावेश नसल्याचे नमूद करणाऱ्या अहवालानुसार तुम्ही जाऊ नये. तुमचे सर्व अधिकारी या प्रकरणांमध्ये अडकले असल्यामुळे त्याचा तुमच्यावर परिणाम होणे स्वाभाविक आहे,’’ असे टी. एस. ठाकूर आणि एफ. एम. आय. कलिफुल्ला यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले. मुद्गल अहवालात श्रीनिवासन यांच्याविरोधात कोणतेही आरोप नाहीत, असे त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते.
‘‘कोणतेही अनुमान काढू नका. माझा या प्रकरणांमध्ये समावेश नाही, असे सांगून तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहात. परंतु तुमच्या नजीकचे कुणी तरी यात गुंतले आहेत,’’ असे या खंडपीठाने पुढे सांगितले.
श्रीनिवासन बीसीसीआयचे अध्यक्ष असताना ते संघ कसा खरेदी करू शकतात, असा सवाल यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केले. ‘‘बीसीसीआय आणि आयपीएल हे स्वतंत्र म्हणता येणार नाही. कारण बीसीसीआयची आयपीएल ही निर्मिती आहे किंवा उत्पादन आहे,’’ असे याबाबत म्हटले.
‘‘बीसीसीआयमधील काही मंडळींनी संघ खरेदी केली आहे. हा अनुकूलतेचा कारभार आहे. संघाच्या मालकीमुळे हितसंबंध समोर येतात. बीसीसीआयचे अध्यक्ष आयपीएल चालवतात. मग तुमचा संघ कसा असू शकतो,’’ असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला.
आयपीएलच्या सहाव्या हंगामातील स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणांमुळे क्रिकेटचा त्रिफळा उडवण्यात आला आहे, असे नमूद करीत सर्वोच्च न्यायालयाने चिंता प्रकट केली. खंडपीठाने याबाबत म्हटले की, ‘‘क्रिकेट हा देशात धर्म मानला जातो. त्यामुळे क्रिकेट पुन्हा सभ्य स्वरूपात असायला हवे. जर तुम्ही या गोष्टींना थारा द्याल, तर तुम्ही क्रिकेटला नष्ट कराल. मग कुणीही स्टेडियमवर पाऊल ठेवणार नाही. सामने आधीच निश्चित झालेले आहेत, यावर लोकांचा विश्वास बसू लागला तर कुणीही ते पाहायला येणार नाही. क्रिकेट हा तमाशा आहे, याची जाणीव ठेवूनच लोकांनी स्टेडियमवर जावे का,’’ असा गंभीर सवाल खंडपीठाने विचारला. क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ म्हणून टिकायला हवा आणि त्याच्यातील सच्चेपणा जपायला हवा, असे नमूद केले.
न्या. मुकुल मुदगल समितीच्या चौकशी अहवालानुसार आयपीएलच्या सहाव्या हंगामात घडलेल्या कथित गैरप्रकारांबाबत कारवाई करण्यापलीकडे बीसीसीआयसमोर कोणताही पर्याय उरलेला नाही, असे खंडपीठाने म्हटले.
‘‘भारतात क्रिकेटवर लोक जीवापाड प्रेम करतात. देशात हा धर्म मानला जातो आणि तितकीच आत्मीयता त्याविषयी असते. ज्यांची यात कोणतीही आर्थिक गुंतवणूक नाही, तरी ते प्रेम करतात. या देशात अब्जावधी लोक कोणतीही गुंतवणूक नसताना या खेळावर निस्सीम प्रेम करतात. तुम्ही खेळाची तरलता जपायला हवी. निर्णयातील साशंकतेचा फायदा हा खेळाला मिळायला हवा, कुणालाही वैयक्तिकपणे मिळायला नको,’’ अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला सुनावले.
‘‘खेळ आयोजित करणे आणि सर्व वाईट घडणाऱ्या गोष्टींना दूर ठेवणे, हे तुमचे काम आहे. अध्यक्ष म्हणून हे तुमचे कर्तव्य आहे. सर्व संघांचे दर्जात्मक नियोजन व्हायला हवे. अशा प्रकारे ते घडता कामा नये. खेळ स्वच्छपणे खेळला जायला हवा. परंतु दुर्दैवाने येथे सारे संशयास्पद आहे,’’ असे खंडपीठाने म्हटले आहे. ही सुनावणी निर्णयापर्यंत न आल्यामुळे मंगळवारी याबाबत पुढील सुनावणी होईल.
श्रीनिवासन यांच्या वाटेवर हितसंबंधांचे काटे!
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावर पुन्हा विराजमान होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या एन. श्रीनिवासन यांना सर्वोच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांमुळे सोमवारी धक्का बसला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-11-2014 at 02:14 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court slams n srinivasan for conflict of interest in ipl