स्वातंत्र्यदिनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्! अशा घोषणा देणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ जम्मू काश्मीरमधील लाल चौकातील असल्याचा उल्लेख करुन सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे. काश्मीर खोऱ्यातील तणावपूर्ण परिस्थितीत महिलेने केलेल्या साहसी देशप्रेमाचे सर्वत्र कौतुक सुरु आहे. घोषणाबाजी करताना संबंधित महिलेने राष्ट्रध्वज उलटा धरला असला तरी याकडे दुर्लक्ष करुन तिच्या साहसीवृत्तीवर नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने देखील या महिलेच्या देशभक्तीला सलाम केलाय. रैनाने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन काश्मीर खोऱ्यात देशभक्ती दाखवणाऱ्या महिलेचे कौतुक केले. तसेच त्याने घोषणा देणाऱ्या महिलेचा व्हिडिओ शेअर केला असून स्वातंत्र्यदिनी श्रीनगरमध्ये ‘भारत माता की जय’ अशी घोषणा देणारी महिला खूपच धाडसी आहे. असा उल्लेख ट्विटमध्ये केलाय. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी देखील या महिलेचे कौतुक करत ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम अशी घोषणाबाजी करणाऱ्या महिलेचा व्हायरल झालेला व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केलाय. त्यांनी ट्विटवर लिहिलंय की, ‘एकट्या काश्मिरी पंडित महिलेने श्रीनगरच्या चौकात ‘वंदे मातरम्! आणि ‘भारत माता की जय’, अशा घोषणा देणाऱ्या महिलेला मी सलाम करतो. हे दृश्य लाल चौकातील असल्याची चर्चा असून, सुरेश रैना आणि अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर प्रश्नावरही भाष्य केले होते. यावेळी काश्मीरचा विकास आणि तेथील जनतेचे स्वप्न पूर्ण करण्यास सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. एवढेच नाही तर लाल किल्ल्यावरील भाषणात मोदींनी जम्मू-काश्मीरमधील फुटिरतावाद्यांवर निशाणा साधला होता. काश्मीरचा प्रश्न गोळी किंवा शिवीगाळ करुन नव्हे; तर गळाभेटीनेच सुटेल, असे ते म्हणाले होते.

Story img Loader