IPLला अवघे १९ काहीच दिवस राहिले आहेत. सर्व चाहत्यांची आणि खेळाडूंची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी एकामागे एक वाईट बातम्या येताना दिसत आहेत. सुरुवातीला त्यांच्या चेन्नईतील ट्रेनिंग कॅम्पवर BCCIने नाराजी दर्शवली. त्यानंतर त्यांच्या २ खेळाडूंना आणि १२ सहाय्यक कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. त्यानंतर सुरेश रैनाने वैयक्तिक कारण देत संपूर्ण IPLमधूनच माघार घेतली. वाईट बातम्यांची मालिका सुरू असतानाच चेन्नईसाठी एक दिलासा देणारी घटना घडली. CSKचे दोन तगडे क्रिकेटपटू युएईमध्ये दाखल झाले.
दक्षिण आफ्रिकेचे तीन दमदार खेळाडू मंगळवारी IPL 2020साठी युएईमध्ये दाखल झाले. फाफ डू प्लेसिस, लुंग एन्गीडी आणि कॅगिसो रबाडा हे तिघे आफ्रिकेतून मंगळवारी सकाळी युएईमध्ये आले. या तिघांपैकी फाफ डू प्लेसिस आणि लुंगी एन्गीडी दोघे चेन्नईच्या ताफ्यात दाखल होणार आहेत, तर रबाडा दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात सामील होणार आहे. दोन्ही संघांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या खेळाडूंचे फोटो ट्विट केले आहेत.
Early morning glories from the Rainbow Nation! #StartTheWhistles #HomeSweetDen pic.twitter.com/fGOtgJ1LIN
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 1, 2020
Johannesburg, South Africa to Dubai, UAE @KagisoRabada25 checked in so fast, we almost missed his entry #Dream11IPL #YehHaiNayiDilli @Address_Hotels pic.twitter.com/GPJd74uL37
— Delhi Capitals (Tweeting from) (@DelhiCapitals) September 1, 2020
रैनाच्या अनुपस्थितीत डु प्लेसिस हा चेन्नईसाठी आधार ठरू शकतो. IPLमध्ये त्याने ७१ सामन्यात १८५३ धावा केलेल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे गेल्या हंगामात त्याने १२ सामने खेळत ३९६ धावा केल्या होत्या. त्यात ९६ धावांची त्याची सर्वश्रेष्ठ वैयक्तिक खेळीदेखील समाविष्ट होती. IPL 2019 मध्ये त्याने ३ अर्धशतके ठोकली होती.
लुंगी एन्गीडी हा देखील चेन्नईसाठी भरवशाचा गोलंदाज आहे. दीपक चहर सध्या करोनाग्रस्त आहे. तो झटपट पूर्णपणे तंदुरूस्त न झाल्यास सुरूवातीच्या सामन्यांमध्ये एन्गीडीचा सलामी गोलंदाजीचा भार एकटा पेलवू शकतो. एन्गीडीने २०१८च्या IPLमध्ये ७ सामन्यात ११ बळी घेतले होते. त्यात एकदा एकाच सामन्यात ४ बळी टिपण्याची किमयाही साधली होती. त्या सामन्यात त्याने १० धावांत ४ बळी घेतले होते.