उसळत्या चेंडूंवर आत्मविश्वासाने फटकेबाजी करण्यासाठी सुरेश रैनाच्या खेळात आणखी सुधारणा होण्याची आवश्यकता आहे, असे माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनी सांगितले.
‘‘एकदिवसीय सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या संघात रैनाचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र तो पुन्हा संघात स्थान मिळवेल. उसळत्या चेंडूंवर खेळताना अनेक अनुभवी खेळाडूंना समस्या जाणवत असतात. रैनाने या चेंडूंवर खेळायचे कसे, याचा बारकाईने अभ्यास करावा. त्यामुळे त्याच्या खेळात परिपक्वता येईल,’’ असे लक्ष्मणने सांगितले.
‘‘विराट कोहली व रोहित शर्मा या खेळाडूंना यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूंवर फटके मारताना अडचणी येत असतात. चेतेश्वर पुजाराला यष्टीवर समोरून येणाऱ्या चेंडूंबाबत अनेक वेळा समस्या आली आहे. हे लक्षात घेता कोणताही फलंदाज शंभर टक्के परिपूर्ण नसतो. त्यामुळेच रैना याने आपल्या खेळात सुधारणा होण्यासाठी लक्ष केंद्रित करावे,’’ असेही लक्ष्मण यांनी सांगितले.
आशीष नेहराच्या समावेशाचे समर्थन करताना लक्ष्मण म्हणाले, ‘‘नेहराकडे संघाला एकहाती विजय मिळवून देण्याची क्षमता आहे. संघात मिळालेले स्थान ही सुवर्णसंधी आहे, हे लक्षात घेऊन त्याने दिशा व टप्पा यावर नियंत्रण ठेवीत गोलंदाजी करावी, म्हणजे त्याला चांगले यश मिळू शकेल.’’

Story img Loader