झिम्बाब्वे दौऱ्यासाठी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी विश्रांती घेतल्यावर कर्णधारपदासाठी सुरेश रैनाच्या नावाला प्राधान्य मिळेल, असे बहुतांशी जणांना वाटत होते. पण या दौऱ्यासाठी रैनाला कर्णधारपद तर नाहीच, पण सक्तीची विश्रांती घ्यावी लागली ती आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदीच्या ई-मेलमुळे. कारण मोदी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) लिहिलेल्या सट्टेबाजीशी निगडित पत्रामध्ये रैनाचे नाव होते. त्यामुळेच रैनाला विश्रांती देऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कर्णधारपदाची माळ मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या गळ्यात टाकली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतातील बांधकाम व्यवसायातील एका शक्तिशाली उद्योगपतीकडून तीन खेळाडूंनी काही गोष्टींचा स्वीकार केला होता, असे मोदीने पत्रात लिहिले आहे. या पत्रामध्ये रैनासह रवींद्र जडेजा आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो यांचीही नावे आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यासाठीचा संघ २९ जूनला निवडण्यात येणार होता. पण त्याच्या दोन दिवसांपूर्वीच मोदीने आयसीसीला पत्र लिहिले आणि त्याबाबतचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. निवड समितीला रैनालाच झिम्बाब्वे दौऱ्यावर कर्णधार म्हणून पाठवायचे होते. पण या पत्रामुळे त्यांना निर्णय बदलावा लागला.
रैनाची याबाबत चौकशी का करत नाही, असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांना विचारले असता, ते म्हणाले की, ‘‘हे तिघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत, त्यामुळे त्यांची चौकशी आयसीसीने करायला हवी. आतापर्यंत तरी आयसीसीने या पत्रावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही. आयसीसीकडून आम्हाला कोणत्याही प्रकारची सूचनाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना क्लीन चिट मिळाली असल्याचेच दिसत आहे.’’
२०१० साली श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना रैना एका सट्टेबाजी करणाऱ्या महिलेबरोबर दिसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते, पण बीसीसीआयने हे वृत्त फेटाळून लावले होते.
मोदी यांच्या पत्रानंतर रैनाने एक पत्रक काढत आरोपांचे खंडन केले होते. ‘‘जगभरातील माझ्या चाहत्यांना मी सांगू इच्छितो की मी नेहमीच खेळभावनेने खेळत आलो आहे. कोणत्याही गैरप्रकारामध्ये मी कधीही सहभागी नव्हतो. माझ्यावर केलेले आरोप हे खोटे आहेत. क्रिकेट माझ्यासाठी सर्वस्व आहे. या पत्राबाबत योग्य ते पाऊल मी उचलणार आहे,’’ असे रैनाने पत्रकामध्ये म्हटले होते.
ललित मोदीच्या ई-मेलमुळेच रैनाला विश्रांती
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी विश्रांती घेतल्यावर कर्णधारपदासाठी सुरेश रैनाच्या नावाला प्राधान्य मिळेल, असे बहुतांशी जणांना वाटत होते.
First published on: 08-08-2015 at 02:08 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh raina rested after name pops up in lalit modi email to icc