आयसीसीने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची टी-२० विश्वचषक २०२४ साठी अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. यासह तो ख्रिस गेल, युवराज सिंग आणि उसेन बोल्टच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. पण यादरम्यानच एका पाकिस्तानी रिपोर्टरने भारत वि पाकिस्तान असा सोशल मीडियावर वाद सुरू केला आहे. यादरम्यान त्याने सुरेश रैनाला प्रश्न विचारत स्वतच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली.
एका पाकिस्तानी पत्रकाराने त्याच्या एक्स अकाऊंटवर शाहीद आफ्रिदी आणि सुरेश रैनाचा कॉमेंट्री करतानाचा असे फोटो पोस्ट केले. शाहीद आफ्रिदीला आयसीसीने टी-२० वर्ल्डकपचा अॅम्बेसेडर नेमल्यानंतरची ही पोस्ट आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने म्हटले, “ICC ने शाहीद आफ्रिदीला T20 विश्वचषक २०२४ साठी अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. हॅलो सुरेश रैना?”
ICC has named Shahid Afridi as ambassador for ICC T20 World Cup 2024.
— ٰImran Siddique (@imransiddique89) May 24, 2024
Hello Suresh Raina ? pic.twitter.com/IvHOIYoJ8j
खरंतर ही पोस्ट करण्यामागचं कारण आहे पहिल्या क्वालिफायरमधील सुरेश रैनाचं मजेदार वक्तव्य. अहमदाबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि केकेआर यांच्यातील पहिल्या क्वालिफायर सामन्यादरम्यान ही घटना घडली. आकाश चोप्राने त्याला क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याबाबत विचारले. चोप्रा म्हणाले की, जर तुला पुन्हा मैदानावर परतायचे असेल तर तू येऊ शकतोस.
या प्रश्नावर रैना स्वतः हसायला लागला आणि म्हणाला की मी सुरेश रैना आहे, शाहिद आफ्रिदी नाही. हे ऐकून चोप्राही जोरात हसले. रैनाने केवळ एका ओळीने आफ्रिदीला ट्रोल केले. आफ्रिदी निवृत्तीनंतरही क्रिकेटच्या मैदानात परतला होता. आफ्रिदी एकदा नव्हे तर अनेकदा असे केले आहे. रैना आणि चोप्राच्या संभाषणाचा व्हिडिओही कुणीतरी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. याच संभाषणाच्या व्हीडिओमधील स्क्रिनशॉट या पाकिस्तानी पत्रकाराने या पोस्टमध्ये शेअर केला. सुरेश रैनाने २०२० मध्ये निवृत्ती जाहीर केली होती.
टीम इंडियाच्या माजी स्टार क्रिकेटरने पाकिस्तानी पत्रकाराला सडेतोड प्रत्युत्तर दिले आणि लिहिले, “मी ICC ॲम्बेसेडर नाही, पण २०११ चा वर्ल्डकप आम्ही जिंकला आहे. मोहालीमधील सामना आठवतोय का? आशा आहे की यामुळे तुमच्या काही अविस्मरणीय आठवणी पुन्हा ताज्या होतील.” यानंतर चाहत्यांनी या पोस्टवर पाकिस्तानी पत्रकाराची चांगलीच फिरकी घेतली आहे. भारताने २०११ च्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता, जो मोहालीमध्ये खेळवण्यात आला होता.
Suresh Raina ?? pic.twitter.com/siq7Hu3QXh
— RVCJ Media (@RVCJ_FB) May 24, 2024
यंदाचा टी-२० विश्वचषक १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसए यांच्या संयुक्त विद्यमाने टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, तर अंतिम सामना २९ जून रोजी होणार आहे. भारतीय संघ ५ जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने टी-२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर ९ जून रोजी टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.