२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपूष्टात आलं. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाच चौथ्या क्रमांकावर कोणत्या फलंदाजाने खेळण्यासाठी याव यावरुन बराच उहापोह झाला. विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतरही विंडीज आणि आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून भारतीय संघ व्यवस्थापन सध्या संघ बांधणीच्या तयारीमध्ये आहे. यासाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानेही चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी आपण शर्यतीमध्ये असल्याचं सांगितलं आहे.

“मी भारतासाठी चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. मी याआधीही त्या जागेवर फलंदाजी केली आहे आणि मी स्वतःला सिद्ध केलंय. आगामी विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून मी संधी मिळण्याची वाट पाहतो आहे.” ‘द हिंदू’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुरेश रैना बोलत होता. २०१८ साली इंग्लंडविरुद्ध सुरेश रैना भारताकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

आणखी वाचा- “कोणत्या मालिकेत खेळायचं ते धोनीने ठरवू नये”; गंभीर भडकला

इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषकाच्या आधीपासून भारतीय संघाने अंबाती रायुडू, विजय शंकर, मनिष पांडे, ऋषभ पंत या फलंदाजांना चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली. अंबाती रायुडूने काही सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आश्वासक खेळ केला होता, मात्र निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. विश्वचषकानंतर धोनी क्रिकेटपासून दूर असताना, निवड समितीने ऋषभ पंतला संघात संधी दिली मात्र त्यालाही मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही. त्यामुळे आगामी मालिकांमध्ये भारतीय संघ व्यवस्थापन चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी कोणत्या खेळाडूचा विचार करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader