Champions Trophy 2025 Suresh Raina statement on Rohit Sharma : टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि सध्याचा क्रिकेट समालोचक सुरेश रैनाने दावा केला आहे की, जर रोहित शर्मा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आधी फॉर्ममध्ये आला तर आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वेगळ्या प्रकारचा कर्णधार पाहायला मिळेल. याशिवाय पाकिस्तान आणि यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्येही त्याचा दृष्टिकोन वेगळा असेल. रोहित शर्माला बऱ्याच दिवसांपासून धावा काढताना संघर्ष करत आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला हिटमॅन रोहित शर्मा कसोटी आणि आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही निस्तेज दिसत आहे.
सुरेश रैना काय म्हणाला?
माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैना जिओस्टारवर म्हणाला, “जर रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सूर गवसला तर आपल्याला वेगळ्या प्रकारचा कर्णधार पाहायला मिळेल. याशिवाय त्याचा दृष्टिकोनही वेगळा असेल.” रोहित शर्माला गेल्या १० डावांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० धावांचा टप्पाही गाठता आलेला नाही. गेल्या २० डावांमध्येही त्याची सरासरी १० च्या आसपास राहिली आहे, जी त्याच्या आणि टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे.
रोहित शर्माने मायदेशात न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आणि नंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये फ्लॉप झाल्यानंतर रणजी सामन्यात प्रवेश केला. तिथे तो पहिल्या डावात फ्लॉप झाला, तर दुसऱ्या डावात त्याने काही झटपट धावा केल्या. अशा परिस्थितीत पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर त्याचा फॉर्म परत येईल, असे बोलले जात होते, मात्र तसे झाले नाही.
नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला 7 चेंडूत केवळ २ धावा करता आल्या. साकिब महमूदच्या चेंडूवर फ्लिक करण्याच्या प्रयत्नात बॅटच्या कडेवर चेंडू लागला आणि चेंडू हवेत उडाला, ज्यामुळे तो झेलबाद झाला. तो प्रचंड निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. आता मालिकेतील उरलेल्या दोन सामन्यांमध्ये त्याची कामगिरी कशी होते हे पाहणे महत्व्वाचे ठरणार आहे.