भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनाचे वडील त्रिलोकचंद रैना यांचे रविवारी निधन झाले. ते दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी रैनाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली.
३५ वर्षीय माजी डावखुरा फलंदाज रैनाने आपल्या ट्विटर हँडलवर वडिलांसोबतचा एक जुना फोटो शेअर करत लिहिले, ”वडील गमावल्याचे दु:ख शब्दात व्यक्त करता येणार नाही. काल मी माझ्या वडिलांना गमावले, त्यासोबत माझी सपोर्ट सिस्टीमही गेली, माझी ताकद संपली. शेवटच्या श्वासापर्यंत ते लढवय्ये राहिले. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो बाबा. तुमची नेहमीच आठवण येईल.”
हेही वाचा – T20 World Cup 2022 : …अन् काही मिनिटांतच विकली गेली भारत-पाक सामन्याची तिकिटं!
सुरेश रैनाचे वडील लष्करातून निवृत्त झाले होते. हरभजन सिंग, रैनाचा माजी आयपीएल सहकारी चेन्नई सुपर किंग्जनेही कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. सुरेश रैना २०११च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग आहे. त्याने भारतासाठी १८ कसोटी आणि २२६ एकदिवसीय सामने आणि ७८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
१५ ऑगस्ट २०२० रोजी रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्याच दिवशी महेंद्रसिंह धोनीनेदेखील आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला रामराम ठोकला.