पीटीआय, लिमा (पेरू)
युवा नेमबाज सुरुची सिंहने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मनू भाकरला मागे टाकत सलग दुसऱ्या विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
गेल्याच आठवड्यात ब्यूनोस आयर्स येथे झालेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक स्पर्धेतही सुरुचीने सुवर्णयश मिळवले होते. आता कामगिरीत सातत्य राखताना १८ वर्षीय सुरुचीने पेरू येथील स्पर्धेत २४ फैरींच्या अंतिम फेरीत २४३.६ गुण मिळवत मनूला १.३ गुणांनी मागे टाकले. मनूने २४२.३ गुणांचा वेध घेतला. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे या दोघीही हरियाणाच्या झज्जर येथील रहिवासी आहेत. चीनच्या याओ कियानक्सुनने २१९.५ गुणांसह कांस्यपदक मिळवले. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या ६० फैऱ्यांच्या पात्रता फेरीत सुरुचीने ५८२ गुणांसह दुसरे स्थान मिळवले होते. मनूने ५७८ गुणांसह चौथ्या स्थानी राहत अंतिम फेरी गाठली. भारताची अन्य नेमबाज सैन्यम ५७१ गुणांसह ११व्या स्थानी राहिली.
मिश्र सांघिक गटातही यश…
एकेरीतील यशापाठोपाठ सुरुची सिंहने १० मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र सांघिक गटातही सौरभ चौधरीच्या साथीने सुवर्णपदकाची कमाई केली. सुवर्ण लढतीत सुरुची आणि सौरभ यांनी मिळून १७ गुणांचा वेध घेताना चीनच्या क्विआनशून याओ आणि काय हू जोडीचा पराभव केला. याओ-हू जोडीला केवळ ९ गुणच मिळवता आले.