Ajit Agarkar on Team India: आशिया कप २०२३ आणि एकदिवसीय विश्वचषक २०२३ येत्या काही दिवसात सुरूवात होणार आहेत. दोन्ही स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर झाले असून ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान आशिया चषक पार पडणार असून त्यानंतर लगेचच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वन डेचा वर्ल्डकप संपन्न होणार आहे. ३० ऑगस्टपासून आशिया कप आणि ५ ऑक्टोबरपासून विश्वचषक खेळवला जाणार आहे. दुसरीकडे, भारताचा संघ अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र, आर अश्विन आणि सूर्यकुमार यादव यांचीही आशिया कप आणि विश्वचषक स्पर्धेसाठी निवड होऊ शकते. त्यामुळे बीसीसीआयचे नवे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर संघ निवडीसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा करणार आहेत.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “अश्विन आधीच वर्ल्ड कपमधून बाहेर आहे असे म्हणणे चुकीचे आहे. तो निवडकर्त्यांचा निर्णय असून अजित आगरकर या दोन्ही खेळाडूंसाठी खूप आग्रही आहेत. भारतीय खेळपट्ट्यांवर अश्विन किती महत्त्वाचा असू शकतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अजित आगरकर वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान राहुल द्रविड आणि रोहित शर्माला भेटत आहे. आशिया चषक आणि विश्वचषकासाठी संघांच्या निवडीबद्दल चर्चा करणार आहेत.”
मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये रिस्ट स्पिनर किती महत्त्वाचे बनले आहेत हे आयपीएलमधील त्यांच्या कामगिरीवरून कळते. त्यामुळे विश्वचषक २०२३ मध्ये अश्विन नसेल असे म्हटले जात होते पण अजित आगरकर यांच्या पारखी नजरेने तो पुन्हा चर्चेत आला आहे. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांची जोडी विकेट घेण्याच्या बाबतीत महत्वाची मानली जाते पण त्याचा फॉर्म कसा आहे? हा सध्या संशोधनाचा विषय आहे. दुसरीकडे रवींद्र जडेजा उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि जोडीला अक्षर पटेल देखील आहे, हे दोघेही उत्तम फलंदाजी करून संघाच्या बॅटिंग लाइन अपला सखोलता प्रदान करू शकतात.
सूर्यकुमारबद्दल बीसीसीआयचे मोठे विधान
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “सूर्या निश्चितपणे विश्वचषक संघ निवडीच्या योजनेचा भाग आहे परंतु सध्या तो फक्त बॅकअप आहे. के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरत आहेत. ऋषभला स्थान मिळण्याची शक्यता कमी असल्याने १५ जणांच्या संघात अतिरिक्त विकेटकीपर म्हणून त्याचा सहभाग असू शकतो.” याबाबत आगरकर रोहित आणि राहुल यांच्याशी चर्चा करतील.