Joe Root on Indian Batsman: इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज जो रूटने टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवचे कौतुक केले आहे. ‘मिस्टर ३६०’ अशी ओळख असणाऱ्या सूर्यकुमारबद्दल अनेकदा चर्चा होते. सूर्याने टी२० क्रिकेटमध्ये खूप वेगाने आपले नाव कमावले आहे. मात्र, सूर्याला वन डे क्रिकेटमध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान रूटचा असा विश्वास आहे की, सूर्यकुमार चांगली कामगिरी करत आहे. परंतु, त्याला जर सचिन तेंडुलकर आणि केविन पीटरसनसारखे बनायचे असेल तर त्याला युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणा देणारी कामगिरी करावी लागेल.
जो रूटने सूर्याविषयी क्रिकबझशी बोलताना सांगितले की, “सूर्यकुमार यादवची क्षमता आणि त्याचा स्वीप शॉट हा थक्क करणारा आहे. कमी कालावधीत त्याने इतकी शतके कशी झळकावली? याचेच मला आश्चर्य वाटते आहे. विशेषत: तो कोणत्या ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो तिथे वेगाने धावा करणे खूप अवघड असते. त्याच्याबाबतीत ही खरोखरच उल्लेखनीय अशी गोष्ट आहे. त्याला गोलंदाजी करणे खूप कठीण आहे कारण, तो मैदानाच्या अशा असामान्य भागात खेळतो जिथे कोणताही तरुण खेळाडू त्याला फक्त पाहत राहतो आणि त्याच्या शॉट्सचा आनंद घेत राहतो. काही युवा खेळाडू हे त्याच्यासारखे शॉट्सचा मारण्याचा सराव करत आहेत.”
जो रुटने सूर्यकुमार यादवची तुलना करताना तेंडुलकर-पीटरसनचे दिले उदाहरण
केविन पीटरसन किंवा सचिन तेंडुलकरसारखा वारसा मिळवण्यासाठी सूर्यकुमारला युवा क्रिकेटपटूंसाठी एक प्रेरणास्थान बनावे लागेल. याविषयी रूट म्हणाला, “सूर्या हा खूप चतुर आणि हुशार फलंदाज आहे. तो चेंडू ज्या पद्धतीने खेळतो त्यावरून त्याच्यातील कौशल्य समज दिसून येते. तो नेहमी गोलंदाजाला नाही तर त्याच्या डोक्यातील विचारांशी खेळत असतो. त्याला माहिती असते की गोलंदाज आता कुठे चेंडू टाकणार आहे. त्याचे शॉट हे सगळे मागच्या बाजूला असतात. तो फटके असे मारतो जिथे खेळाडू नसतो आणि हे सर्वांनाच जमते असे नाही. त्याने स्वत:ला एक महान टी२० खेळाडू बनवले आहे. पण एबीडी आणि केविन पीटरसन सारखे लोक अनेक पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देतात. जर त्यांच्या सारखे व्हायचे असेल तर एकदिवसीय आणि कसोटीमध्ये त्याने अधिक लक्ष केंद्रित करायला हवे, तरच तो तरुण खेळाडूंनाही प्रेरणा बनेल.”
इंग्लंडचा माजी कर्णधार पुढे म्हणाला, “सचिन हा विराटसाठी एक मोठा प्रेरणास्थान होता. आम्ही सगळे सचिन सारख्या खेळाडूंकडे बघूनच मोठे झालो. हीच तर खरी या गेममध्ये घडणारी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुम्ही लहान मुलांना बॅट आणि बॉल उचलण्यासाठी आणि गेममध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित करता. सूर्याही तेच करत आहे. बरेच तरुण त्याच्याकडे आशेने बघत आहेत आणि त्याच्यासारखे काहीतरी वेगळे करत आहेत. एक दिवस सूर्यकुमार हा सचिन आणि पीटरसनसारखा एक प्रेरणास्थान बनेल, त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!”