अन्वय सावंत
मुंबई : काही वर्षांपूर्वी सूर्यकुमार यादवविरुद्ध मी पहिल्यांदा ‘आयपीएल’मध्ये खेळलो होतो. त्यावेळी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट अशाप्रकारे गाजवेल असा विचारही केला नव्हता. त्याची कामगिरी खूपच उल्लेखनीय आहे, अशा शब्दांत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने भारताच्या फलंदाजाचे कौतुक केले.
सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कोणताही चेंडू मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात मारण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे त्याची डिव्हिलियर्सशी तुलना केली जाते आहे. डिव्हिलियर्स ‘मिस्टर ३६० डिग्री’ म्हणून ओळखला जायचा आणि आता हे विशेषण सूर्यकुमारसाठी वापरले जाते आहे.
‘‘सूर्यकुमारच्या कामगिरीने आणि त्याच्या फलंदाजीच्या शैलीने मी खूप प्रभावित झालो आहे. काही वर्षांपूर्वी मी त्याच्याविरुद्ध खेळलो होतो. त्यावेळी त्याची खेळण्याची शैली फार वेगळी होती. तो सावधपणे खेळणारा, डाव सावरणारा फलंदाज होता. मात्र, सूर्यकुमारचा आत्मविश्वास वाढत गेला. त्याला स्वत:च्या फलंदाजीतील नवे पैलू उलगडले. तो आता कारकीर्दीच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे तो वैविध्यपूर्ण फटके मारण्यास घाबरत नाही. परंतु आता त्याने सातत्य टिकवणे गरजेचे आहे,’’ असे डिव्हिलियर्सने सांगितले.
तसेच सूर्यकुमार आणि डिव्हिलियर्स यांच्यात तुलना केली जाते आहे. त्याविषयी विचारले असता डिव्हिलियर्स म्हणाला, ‘‘मला कमी वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली होती, तर सूर्यकुमारला त्यासाठी वाट पाहावी लागली. आमच्यात हा फरक आहे. मात्र, आमच्या खेळण्याच्या शैलीत नक्कीच साम्य आहे.’’ भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने ट्वेन्टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या आहेत. कोहलीला पुन्हा सूर गवसला याचे अजिबातच आश्चर्य वाटले नसल्याचेही त्याचा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघातील माजी सहकारी डिव्हिलियर्स म्हणाला.
जगातील सर्वात मोठी हौशी
ट्वेन्टी-२० क्रिकेट लीग अशी ख्याती असलेल्या ‘द लास्ट मॅन स्टँड्स इंडिया सुपर लीग २०२३’च्या पहिल्या पर्वाची मंगळवारी डिव्हिलियर्सच्या उपस्थितीत घोषणा करण्यात आली. डिव्हिलियर्स हा स्पर्धेचा सदिच्छादूत आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना होईल, असा माझा अंदाज आहे. या सामन्यात भारतीय संघ बाजी मारेल आणि विश्वचषकावर पुन्हा आपले नाव कोरेल. सूर्यकुमार आणि कोहली अप्रतिम कामगिरी करत आहेत. इतकेच नाही, तर भारतीय संघात प्रतिभावान खेळाडूंची संख्या खूप मोठी आहे.
– एबी डिव्हिलियर्स