Suryakumar Yadav can be made the captain of the Indian team for the T20 series against Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्याची चर्चा अद्याप संपलेली नाही, तितक्यात २३ नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमध्ये होणार्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी कर्णधाराचे नाव समोर येऊ लागले. सोमवार २० नोव्हेंबरच्या संध्याकाळी सूर्यकुमार यादवला टीम इंडियाचा कर्णधार नियुक्त केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. एवढेच नाही तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा करार संपला आहे, त्यामुळे आगामी मालिकेसाठी आणखी एका दिग्गज खेळाडूला ही जबाबदारी दिली जाऊ शकते.
कोण होणार कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक?
क्रिकबझच्या वृत्तानुसार, आगामी टी-२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादवला टीम इंडियाचा कर्णधार बनवले जाऊ शकते. तर व्हीव्हीएस लक्ष्मणकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी दिली जाऊ शकते. याआधीही लक्ष्मणने अनेक वेळा मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच, संपूर्ण मालिकेत कर्णधारपद भूषवण्याची सूर्याला ही पहिलीच संधी असेल. मात्र, आता याबाबत बीसीसीआयच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.
कोणत्या खेळाडूंना स्थान मिळेल?
आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत सहभागी झालेल्या बहुतांश खेळाडूंना स्थान मिळणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्या दौऱ्यात जसप्रीत बुमराहने संघाचे नेतृत्व केले होते. मात्र आता त्याला विश्रांती देण्यात येणार आहे. याशिवाय प्रसिध कृष्णा संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच हार्दिक पांड्याला वर्ल्ड कप दरम्यान दुखापत झाल्याने त्याच्या नावाचा विचार करण्यात आलेला नाही. पण तो असता तर कर्णधार झाला असता, असे सांगण्यात आले. श्रेयस अय्यरच्या नावाचीही चर्चा होती मात्र कामाच्या ताणामुळे त्याचे नाव आले नाही. त्याचबरोबर या मालिकेतून भुवनेश्वर कुमार पुनरागमन करणार असल्याची चर्चा आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचे वेळापत्रक –
पहिला सामना- २३ नोव्हेंबर (विशाखापट्टणम)
दुसरा सामना- २६ नोव्हेंबर (तिरुवनंतपुरम)
तिसरा सामना- २८ नोव्हेंबर (गुवाहाटी)
चौथा सामना- १ डिसेंबर (रायपूर) यापूर्वी नागपुरात होणार होता.
पाचवा सामना- ३ डिसेंबर रोजी (बेंगळुरू) हैदराबाद येथे होणार होती.