कलात्मक आणि आगळ्यावेगळ्या फटक्यांसह मुंबईकर सूर्यकुमार यादवने (३१ चेंडूंत ६५ धावा) साकारलेल्या अर्धशतकामुळे भारताने रविवारी तिसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजवर १७ धावांनी सरशी साधली. या विजयासह भारताने या मालिकेवर ३-० असे वर्चस्व गाजवले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा भारताचा निर्भेळ यशासह सलग तिसरा मालिकाविजय ठरला. या शेवटच्या सामन्यामध्ये चर्चेचा विषय ठरला तो सूर्यकुमार यादव आणि त्याचं सेलिब्रेशन.
तिसऱ्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर भारताने २० षटकांत ५ बाद १८४ अशी धावसंख्या उभारली. या सामन्यात महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला सलामीला संधी मिळाली. मात्र, केवळ चार धावा करून तो जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर इशान किशन (३४) आणि श्रेयस अय्यर (२५) यांनी ५३ धावांची भागीदारी रचली. मात्र, या दोघांसह चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार रोहित (७) काही धावांच्या अंतराने माघारी परतल्याने भारताची १३.५ षटकांत ४ बाद ९३ अशी स्थिती झाली.
त्यानंतर सूर्यकुमार आणि वेंकटेश अय्यर यांनी षटकार-चौकारांची आतषबाजी करत सहा षटकांतच ९१ धावांची भागीदारी रचली. सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील चौथे अर्धशतक झळकावताना ३१ चेंडूंत एक चौकार आणि तब्बल सात षटकारांच्या साहाय्याने ६५ धावांची खेळी केली. त्याला वेंकटेशने १९ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ३५ धावा करत तोलामोलाची साथ दिली.
या सामन्यामध्ये भन्नाट फलंदाजी करत सूर्यकुमारने सर्वांची मनं जिंकली मात्र त्याचबरोबरच त्याचं सेलिब्रेशनही चर्चेत राहिलं. या सामन्यामध्ये भन्नाट फलंदाजी करत सूर्यकुमारने सर्वांची मनं जिंकली मात्र त्याचबरोबरच त्याचं सेलिब्रेशनही चर्चेत राहिलं. सूर्यकुमारने कव्हर ड्राइव्हला फटका लगावत आपलं अर्धशतक साजरं केलं.
सूर्यकुमारने अर्धशतक साजरं केल्यानंतर त्याने भारतीय संघाच्या डगआऊटकडे बॅट उंचावली. सूर्यकुमारची कामगिरी पाहून प्रशिक्षक राहुल द्रविडनेही उभं राहून सूर्यकुमारच्या नमस्कारावर टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. यावेळेस रोहित शर्मानेही हसत टाळ्या वाजवत सूर्यकुमारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं. द्रविड उभा राहून टाळ्या वाजत असल्याचं आणि रोहितनेही टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केल्याचं पाहून सूर्यकुमारने अगदी स्टाइलमध्ये प्रशिक्षक द्रविड तसेच अभिनंदनासाठी टाळ्या वाजवणाऱ्या सर्व संघ सहकाऱ्यांना नमस्कार करत अभिवादन केलं.
या मालिकेमधील दमदार कामगिरीसाठी सामनावीर आणि मालिकावीर हे दोन्ही पुरस्कार सूर्यकुमार यादवला देण्यात आले.