जायबंदी राहुलऐवजी सूर्यकुमारचा भारतीय संघात समावेश; श्रेयसही संधीच्या प्रतीक्षेत
कानपूर : भारताचा अनुभवी सलामीवीर के. एल. राहुल मांडीच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहे. राहुलच्या जागी सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला असून तो आणि श्रेयस अय्यर या दोन मुंबईकरांपैकी एकाला कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीला गुरुवार, २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे प्रारंभ होणार आहे. त्यानंतर ३ डिसेंबरपासून मुंबईत दुसरी कसोटी खेळवण्यात येईल. कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे पहिल्या कसोटीत भारताचे नेतृत्व करणार आहे. रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आल्यामुळे राहुलच्या साथीने मयांक अगरवाल सलामीला येणार, हे जवळपास स्पष्ट झाले होते. परंतु कोलकाता येथे झालेल्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० लढतीपूर्वीच राहुलला दुखापत झाल्याचे समजते. त्यामुळे तो भारतीय संघासह कानपूर येथे न जाता थेट बेंगळूरुला रवाना झाला, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्यांनी दिली.
‘‘सलामीवीर राहुल मांडीच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादवचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुढील महिन्यात रंगणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी राहुलच्या दुखापतीवर बेंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) येथे उपचार करण्यात येतील,’’ असे ‘बीसीसीआय’ने निवेदनात स्पष्ट केले.
आता राहुलच्या अनुपस्थितीत युवा शुभमन गिल मयांकच्या साथीने सलामीला येईल. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि रहाणे अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर खेळतील. तर सहाव्या स्थानी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा फलंदाजीस उतरेल. त्यामुळे पाचव्या स्थानासाठी सूर्यकुमार आणि श्रेयस या दोघांपैकी मुंबईकर रहाणे कुणाला पसंती देणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
सूर्यकुमारला सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेसाठीसुद्धा भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. परंतु त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. दुसरीकडे श्रेयस यापूर्वी २०१७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात बदली खेळाडू म्हणून मैदानावर आला होता. परंतु त्याचीही कसोटी पदार्पणाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. मंगळवारी सराव सत्रात श्रेयस सूर्यकुमारला गोलंदाजी करताना आढळला. त्याशिवाय रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल या तिन्ही फिरकीपटूंनी किमान तासभर गोलंदाजी केली.
यंदा शतकाची वेस ओलांडणारच -पुजारा
भारताच्या कसोटी संघाचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने गेल्या दोन वर्षांपासून शतक झळकावलेले नसले, तरी न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेत आपण शतकाची वेस ओलांडू, याची त्याला खात्री आहे. पुजाराने जानेवारी २०१९मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे अखेरचे कसोटी शतक साकारले होते. ‘‘संघाच्या विजयासाठी सर्वस्व अर्पण करताना मी वैयक्तिक विक्रमांकडे लक्ष देत नाही. गेल्या वर्षभरात मी अनेकदा नव्वदीच्या घरात बाद झालो. परंतु यंदा शतकाची वेस ओलांडेन, अशी आशा आहे,’’ असे पहिल्या कसोटीसाठी उपकर्णधारपद सांभाळणारा पुजारा म्हणाला.
भारताविरुद्ध फिरकी त्रिकुटाची रणनीती -स्टेड
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंड तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकते, असे संकेत प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी दिले आहेत. न्यूझीलंडच्या चमूत मिचेल सँटनर, इश सोधी, एजाझ पटेल, रचिन रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स या पाच फिरकीपटूंचा समावेश आहे. त्यापैकी सँटनर, सोधी आणि पटेल यांना अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळण्याची शक्यता आहे. ‘‘कानपूरची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पोषक असेल. भारताकडे दर्जेदार फिरकीपटू आहेत. परंतु आमच्याकडेही फिरकीसाठी पुरेसे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे दोन वेगवान, तीन फिरकीपटू अशा गोलंदाजांच्या पंचकासह मैदानात उतरण्याचा आम्ही विचार करत आहोत,’’ असे स्टेड म्हणाले.