Suryakumar Yadav to miss series against Afghanistan : विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाची धुरा सांभाळणाऱ्या सूर्यकुमार यादवबाबत एक वाईट बातमी आहे. वास्तविक, नंबर एक टी-२० फलंदाज सूर्यकुमार यादव भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आगामी टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव घोट्याच्या दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळू शकणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत त्याला ही दुखापत झाली होती. अफगाणिस्तानविरुद्धची टी-२० मालिका ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सूर्या आता फेब्रुवारीमध्ये क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार यादवला ही दुखापत झाली. यामुळे तो क्षेत्ररक्षण करताना मैदानाबाहेर गेला. क्षेत्ररक्षण करताना सुरुवातीच्या षटकात सूर्याला ही दुखापत झाली. यानंतर, त्याने सपोर्ट स्टाफ सदस्यांच्या खांद्यावर स्वार होऊन मैदान सोडले, त्यानंतर रवींद्र जडेजाने सामन्यात कर्णधारपदाची धुरा सांभाळली. सूर्याने सामन्यानंतर आपण ठीक असल्याचे सांगितले होते, मात्र आता आलेल्या बातमीने चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.
बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, ३१ वर्षीय सूर्या दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएकडे रिपोर्ट करत आहे. आयपीएलपूर्वी फिटनेस तपासण्यासाठी तो फेब्रुवारीमध्ये रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळू शकतो. हार्दिक पड्या घोट्याच्या दुखापतीतून सावरण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत हार्दिक आणि सूर्यकुमार यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रीय निवड समिती रोहित शर्माला संघाचे नेतृत्व करण्यास सांगू शकते. त्याचवेळी इशान किशनही अफगाणिस्तानविरुद्ध खेळला नाही, तर त्याच्या जागी जितेश शर्माला संधी मिळू शकते.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या रिपोर्टमध्ये सूर्याच्या घोट्यात ग्रेड टू टीअर असल्याचा दावा करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर त्याचे स्कॅन करण्यात आले. यातून दुखापतीचे गांभीर्य लक्षात आले. आता तो किमान महिनाभर तरी खेळू शकणार नाही हे कळले आहे. सूर्या आणि हार्दिक या दोघांच्या अनुपस्थितीत संघाची कमान कोणाकडे सोपवली जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, रोहित शर्माला संघाचे नेतृत्व करण्यास सांगितले जाऊ शकते. त्याने मान्य न केल्यास अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी रवींद्र जडेजाकडे कमान सोपवली जाऊ शकते.
अफगाणिस्तान संघाचा भारत दौरा २०२४ –
११ जानेवारी: पहिला टी-२० सामना, मोहाली
१४ जानेवारी: दुसरा टी-२० सामना, इंदूर
१७ जानेवारी: तिसरा टी-२० सामना, बेंगळुरू
सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता होतील.