पीटीआय, नवी दिल्ली
भारताचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव २०२६ विश्वचषकापर्यंत भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि कर्णधारपदासाठीचा प्रबळ दावेदार असलेल्या हार्दिक पंड्याला तो मागे टाकू शकतो. पंड्याने या महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी स्वत:ला उपलब्ध ठेवले आहे. मात्र, गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आठ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणारा सूर्यकुमार नव्याने मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळणारे गौतम गंभीर व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांची पहिली पसंती असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा >>>IND vs SL : ‘विराट-रोहितच्या जागी ‘या’ खेळाडूंना सलामीला संधी द्या…’, माजी खेळाडूची मागणी
गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजमध्ये भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावला. यानंतर रोहित शर्माने क्रिकेटच्या या प्रारुपातून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर नवीन कर्णधाराचा शोध कायम आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेत्या संघातील पंड्या वैयक्तिक कारणांमुळे श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेविरुद्धचे ट्वेन्टी-२० सामने २७ ते ३० जुलैदरम्यान पालेकेले येथे होणार आहे. यानंतर दोन ते सात ऑगस्टदरम्यान कोलंबो येथे एकदिवसीय मालिका होईल. काही दिवसांत श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा होणे अपेक्षित आहे.
‘‘हार्दिक पंड्या भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा उपकर्णधार होता. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी तो उपलब्धही असेल. त्यामुळे तो संघाचे नेतृत्व करेल असे वाटत होते. मात्र, सूर्यकुमार यादव केवळ श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी नाही तर, २०२६ विश्वचषकापर्यंत संभाव्य कर्णधार बनू शकतो,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका वरिष्ठ सूत्राने सांगितले. ‘‘पंड्याने वैयक्तिक कारणामुळे एकदिवसीय मालिकेतून विश्रांती घेतली आहे,’’ अशीही माहिती सूत्राने दिली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत केएल राहुलने संघाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे राहुलवर एकदिवसीय मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. तसेच गिलही या पदासाठी आपली दावेदारी उपस्थित करेल.
स्थानिक क्रिकेट खेळणे अनिवार्य
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रम नसताना सर्व तारांकित क्रिकेटपटूंना स्थानिक क्रिकेट खेळावे लागेल, असे ‘बीसीसीआय’ सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले आहे. मात्र यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमरा यांना सूट देण्यात आली आहे. कसोटी खेळणाऱ्या सर्व खेळाडूंनी ऑगस्टमध्ये होणाऱ्या दुलीप करंडक स्पर्धेतील कमीत कमी एक सामना खेळावा, असे ‘बीसीसीआय’ला वाटते. यानंतर भारतीय संघ बांगलादेश व न्यूझीलंड संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.