Tilak Varma Retired Out Controversy: आयपीएलच्या नव्या हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी पुन्हा एकदा निराशाजनक होताना दिसत आहे. याआधीही अनेकदा मुंबई इंडियन्सची निराशाजनक सुरूवात होऊन नंतर त्यांनी विजयश्री खेचून आणल्याचे दिसले. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी दिसते. शुक्रवारी (४ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या एमआयच्या चौथ्या सामन्यात सांघिक ताळमेळ दिसून आला नाही. १९ व्या षटकात तिलक वर्माला अचानाक मैदानाबाहेर पाठविण्यात आले. या निर्णयानंतर कर्णधार हार्दिक पंड्या आणि प्रशिक्षकांवर टीका होत आहे. खुद्द फलंदाज सूर्यकुमार यादवनेही डगआऊटमध्ये आश्चर्य झाल्याची प्रतिक्रिया दिली होती.
मुंबई इंडियन्स संघात भारतीय क्रिकेट संघाचे दोन विद्यमान कर्णधार खेळत आहेत. भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत आहेत. २०२४ च्या हंगामात रोहित शर्माला कर्णधार पदावरून बाजूला करत हार्दिक पंड्याला कर्णधार करण्यात आले होते. त्यावेळी जशी संघाच्या निर्णयावर टीका केली गेली, तशीच टीका तिलक वर्माला बाहेर पाठविल्यामुळे होत आहे.
१९ व्या षटकात तिलक वर्माला बाहेर पाठविल्यानंतर जिओ हॉटस्टारवर समालोचन करणाऱ्या माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, विरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफ यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. तसेच तिलक वर्माच्या जागी मिचेल सँटनरला मैदानात पाठवले होते. पण तोही मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जात नाही.
तिलक वर्मा अचानाक मैदानातून बाहेर येत असल्याचे पाहून सूर्यकुमार यादवने आश्चर्य व्यक्त केले आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू असताना सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे काय चालले आहे? असे हात वर करून सूचक विधान त्याने केले. यानंतर नाराज झालेल्या सूर्यकुमार यादवची समजूत घालण्यासाठी प्रशिक्षक महेला जयवर्धने पुढे सरसावले आणि त्यांनी त्याच्या कानात पुटपुटत या निर्णयाची माहिती दिली.
तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या मैदानात असताना मुंबई इंडियन्सला १२ चेंडूत २९ धावा हव्या होत्या. १९ वे षटक शार्दूल ठाकूरने टाकले. यावेळी त्याने पहिल्या पाच चेंडूत पाच धावा दिल्या. तर शेवटच्या चेंडूवर फक्त दोन धावा दिल्या. त्यामुळे शेवटच्या षटकात सहा चेंडूत २२ धावा करण्याचे आव्हान मुंबई इंडियन्ससमोर उभे ठाकले.
शेवटच्या षटकाच्या आवेश खानच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्याने षटकार ठोकला. मात्र त्यानंतर आवेश खानने यॉर्कर चेंडूंचा योग्य मारा केल्यामुळे हार्दिकला मोठा फटका खेळायची संधी मिळाली नाही. त्यातच तिसऱ्या चेंडूवर सँटनरला स्ट्राईक देण्यासही हार्दिकने विरोध केला. त्यामुळे त्याच्या या खेळीवर टीका केली जात आहे.