भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. मंगळवारी (२ ऑगस्ट) पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील तिसरा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने विंडीजचा सात गडी राखून पराभव केला. ४४ चेंडूत ७६ धावांची वादळी खेळी करणारा सूर्यकुमार यादव भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. यानंतर, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) टी २० फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

सूर्यकुमार यादवने केवळ २० टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. परंतु, त्याची कामगिरी इतकी उत्कृष्ट आहे की तो पहिल्या क्रमांकावर असलेल्या बाबर आझमच्या अगदी जवळ पोहचला आहे. बाबर आझम फक्त दोन रेटिंग गुणांनी पुढे आहे. सूर्यकुमारला वेस्ट इंडीजविरुद्ध आणखी दोन सामने खेळायचे आहेत. त्यात त्याने चांगली कामगिरी केली तर बाबर आझमची जागा घेऊ शकतो.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी २० मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने २४ आणि दुसऱ्या सामन्यात ११ धावा केल्या. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्याने अप्रतिम खेळ दाखवला. या मॅचविनिंग खेळीने त्याला आयसीसी क्रमवारीत चौथ्या स्थानावरून दुसऱ्या क्रमांकावर नेले आहे. त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान आणि दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमला मागे टाकले आहे. हे दोन्ही फलंदाज आता अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

हेही वाचा -Asia Cup 2022: पाकिस्तानचे ‘हे’ खेळाडू देणार रोहित अँड कंपनीला आव्हान; पीसीबीने केली संघाची घोषणा

बाबर आझम हा एकमेव फलंदाज आहे जो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या तीन खेळाडूंमध्ये आहे. एकदिवसीय आणि टी २० मध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. तर, कसोटी क्रिकेटमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर असताना. सूर्यकुमार यादवमुळे त्याचे टी २० मधील स्थान धोक्यात आले आहे.

Story img Loader