India vs West Indies 3rd T20 Match Updates: टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मध्ये शानदार पुनरागमन करत सात विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी करताना ८३ धावांची दमदार खेळी केली, ज्यामुळे टीम इंडियाने सामना सहज जिंकला. त्याचवेळी, सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने आपल्या कामगिरीबाबत आणि भारताच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रामाणिकपणा जास्त महत्वाचा आहे –
खरं तर, सूर्यकुमार यादवची बॅट आजपर्यंत वनडेमध्ये तशी तळपली नाही, जशी ती टी-२० मध्ये तळपते. जेव्हा त्याला एकदिवसीय सामन्यांबद्दल विचारण्यात आले तेव्हा सूर्या म्हणाला, “माझे एकदिवसीय आकडे खूप खराब आहेत, हे मान्य करायला मला लाज वाटत नाही. कारण प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा आहे. राहुल सर आणि रोहित यांनी मला अधिक सराव करून परिस्थितीनुसार खेळायला सांगितले असले, तरी आता त्यासाठी कामगिरी करणे आणि संघ मला देत असलेल्या संधींचा फायदा घेणे माझ्यावर अवलंबून आहे.”
फलंदाजी करताना ही गोष्ट मनात चालू होती –
दुसरीकडे तिसर्या टी-२० मधील फलंदाजीबाबत सूर्याने सांगितले की, जेव्हा तो फलंदाजीला आला तेव्हा त्याच्या मनात काय चालू होते. सूर्यकुमार यादव म्हणाला की, “मी वेगवान फलंदाजी करावी, कारण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे महत्त्वाचे आहे. मी नेटमध्ये रॅम्प आणि स्कूप्स स्ट्रोकचा भरपूर सराव केला आहे. कारण मला ते शॉट्स खेळायला आवडतात. त्यामुळे मी त्या शैलीत फलंदाजी केली.”
हेही वाचा – IND vs WI 3rd T20: ‘तुला धोनीची सर नाही येणार’; विजयानंतरही हार्दिक पांड्यावर संतापले चाहते, जाणून घ्या कारण
तिलक वर्मामुळे आत्मविश्वास मिळाला –
सूर्यकुमार यादव तिलक वर्माचे कौतुक करताना म्हटले की, “मी तिलकसोबत बराच काळ फलंदाजी केली आहे. आम्ही दोघेही एकमेकांची फलंदाजी समजून घेतो. त्यामुळे तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यावरून मला खूप आत्मविश्वास मिळत होता. कारण या सामन्यात तिलक वर्माने शानदार खेळी केली होती. आम्ही फलंदाजी करत असताना माझ्या मनात एक गोष्ट चालली होती की, भारताने सलग तीन टी-२० सामने कधीही गमावलेले नाहीत. त्यामुळे माझे संपूर्ण लक्ष फक्त जिंकण्यावर होते. आम्ही जिंकू शकलो याचा मला आनंद आहे.”
हेही वाचा – IND vs WI T20:कुलदीप यादवने चहल-हसरंगाला मागे टाकत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथाच गोलंदाज
सूर्यकुमार यादवची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
वास्तविक, सूर्यकुमार यादव सध्या टी-२० मध्ये नंबर वन फलंदाज आहे. पण त्याची वनडेत आतापर्यंतची कामगिरी फारशी खास झालेली नाही. सूर्याने आतापर्यंत २६ एकदिवसीय सामन्यांच्या २४ डावात ५११ धावा केल्या आहेत, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने ५१ टी-२० सामन्यांच्या ४९ डावांमध्ये १७८० धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. सूर्याने एकमेव कसोटीत ८ धावांची इनिंग खेळली आहे.