तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना भारत आणि न्यूझीलंड संघात माऊंट मौनगानुई येथे पार पडला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारताने प्रथम फलंदाजी करताना, सूर्यकुमारच्या शतकाच्या जोरावर ६ बाद १९१ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडला १९२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव १८.५ षटकांत १२६ धावांवर आटोपला. या सामन्यात सूर्याने आपल्या शतकाच्या जोरावर अनेक विक्रम आपल्या नावार केले.
या सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार शतक झळकावले. सूर्यकुमारने ५१ चेंडूत २१७.६५ च्या स्ट्राईक रेटने १११ धावांची खेळी खेळली. सूर्याच्या खेळीत एकूण ११ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. यादरम्यान एका कॅलेंडर वर्षात दोन शतके करणारा तो पहिला भारतीय ठरला. त्याच वेळी, या खेळीदरम्यान, सूर्याने कॅलेंडर वर्षात ११व्यांदा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा केल्या आणि बाबर आझमला मागे सोडले.
बाबरला मागे टाकत सूर्या पोहोचला रिझवानच्या जवळ –
पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिझवानने २०२१ च्या कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक १३ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या. आता सूर्याने ११ वेळा ५० पेक्षा अधिक धवा करून दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सध्या सूर्यकुमार यादव टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच मोहम्मद रिझवान दुसऱ्या स्थानावर कायम आहे. एका कॅलेंडर वर्षात आतापर्यंत किती फलंदाजांनी ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत ते जाणून घेऊया.
मोहम्मद रिझवान – २०२१ च्या कॅलेंडर वर्षात, मोहम्मद रिझवानने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १३ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
सूर्यकुमार यादव- न्यूझीलंडविरुद्धच्या खेळीनंतर सूर्यकुमार यादव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्याने २०२२ च्या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत एकूण ११ वेळा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५० हून अधिक धावा केल्या आहेत.
बाबर आझम – पाकिस्तान संघाचा विद्यमान कर्णधार बाबर आझम याने २०२१ च्या कॅलेंडर वर्षात १० वेळा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५० पेक्षा अधिक धावा केल्या.
मोहम्मद रिझवान – २०२२ च्या कॅलेंडर वर्षातही, मोहम्मद रिझवानने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १० वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
विराट कोहली – माजी भारतीय कर्णधार यंदा धमाकेदार फॉर्ममध्ये दिसला आहे. या वर्षात त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण ९ वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे.