भारतीय ट्वेन्टी२० संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादव एका पत्रकाराच्या पोस्टवरून संतापला आहे. इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करत सूर्यकुमारने आपला राग व्यक्त केला आहे. मुंबईचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने मुंबईऐवजी गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवच युवा खेळाडूंना अन्य संघांकडून खेळण्यासंदर्भात प्रवृत्त करत असल्याचं एका बातमीत म्हटलं आहे. सूर्यकुमारने या बातमीचा आणि पत्रकाराचा खरपूस समाचार घेतला आहे.
‘हा स्क्रिप्ट रायटर आहे का पत्रकार’? असा सवाल सूर्यकुमारने केला. ‘यावर हसायचं असेल तर मी विनोदी चित्रपट पाहणं सोडून देतो आणि यावर हसतो’, असा उपरोधिक टोला सूर्यकुमारने लगावला. ‘एकदम बकवास’ असं म्हणत सूर्यकुमारने तीन खदाखदा हसणारे स्माईली शेअर केले आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, यशस्वी जैस्वालपाठोपाठ टीम इंडियाचा मोठा खेळाडूही मुंबईऐवजी अन्य संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. हा मोठा खेळाडू म्हणजे सूर्यकुमार यादव असल्याची चर्चा आहे पण त्याच्याशी निगडीत सूत्रांनी हे वृत्त नाकारल्याचं बातमीत म्हटलं आहे.
२०२२ मध्ये झालेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेदरम्यान शिस्तभंग केल्याप्रकरणी मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने यशस्वीला मैदानातून बाहेर काढलं होतं. पश्चिम विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यात हा सामना झाला होता. यशस्वी सध्या आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो आहे.
३४वर्षीय सूर्यकुमार यादव भारताच्या ट्वेन्टी२० संघाचा कर्णधार आहे. आयपीएल स्पर्धेची ५ जेतेपदं नावावर असणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा तो अविभाज्य घटक आहे. एक टेस्ट, ३७ वनडे आणि ८३ ट्वेन्टी२० सामन्यात सूर्यकुमारने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. अद्भुत फटकेबाजीसाठी प्रसिद्ध सूर्यकुमारला ३६० डिग्री अशी बिरुदावलीही मिळाली आहे. पक्का मुंबईकर असणाऱ्या सूर्यकुमारने शहरातल्या मैदानांवरच क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली आहेत. २०१० मध्ये त्याने मुंबईसाठी पदार्पण केलं. तेव्हापासून सगळी वर्ष तो मुंबई संघाकडून खेळतो आहे.
सूर्यकुमारचा टीम इंडियातील सहकारी यशस्वी जैस्वालने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईऐवजी गोवाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. मुंबईतल्या वयोगट स्पर्धांमध्ये यशस्वीने आपल्या बॅटचा तडाखा दाखवला आहे. मात्र नव्या हंगामापासून तो गोव्याकडून खेळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने यावर आश्चर्य व्यक्त केलं मात्र त्याला ना हरकत प्रमाणपत्र जारी केलं आहे. यामुळे यशस्वीचा गोव्याकडून खेळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
खेळाडूंनी चांगल्या संधीच्या शोधात दुसऱ्या संघाकडून खेळणं साहजिक आहे. सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही गोवा संघाकडून खेळतो आहे. विदर्भ संघाचा आधारस्तंभ करुण नायर हा मूळचा कर्नाटकचा आहे. मुंबईचा आधारवड असलेला वासीम जाफर अनेक वर्ष विदर्भ संघाकडून खेळला. चांगली संघबांधणी करण्यासाठी आतूर छोटे संघ मोठ्या खेळाडूंना ताफ्यात समाविष्ट करतात. त्यांना प्रोफेशनल्स असं म्हटलं जातं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये प्रोफेशनल्स म्हणून असंख्य खेळाडू खेळतात.
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये यशस्वीने ३६ प्रथम श्रेणी सामन्यात मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. ६०.८५च्या सरासरीने त्याने ३७१२ धावा केल्या आहेत. २०१९ मध्ये त्याने मुंबईसाठी पदार्पण केलं होतं. उत्तर प्रदेशातल्या भदोही इथून मुंबईला येऊन आझाद मैदानाजवळच्या तंबूत राहून यशस्वीने क्रिकेटची आवड जोपासली होती. फावल्या वेळात पाणीपुरीच्या गाडीवरही त्याने काम केलं होतं. परिस्थितीशी संघर्ष करत यशस्वीने दमदार वाटचाल केली आहे. मुंबईतल्या मैदानांवर यशस्वीची बॅट सातत्याने तळपते आहे. २०२० मध्ये झालेल्या U19 वर्ल्डकप स्पर्धेत यशस्वी मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता.
२०२१-११ या पहिल्यावहिल्या रणजी हंगामात यशस्वीने मुंबईसाठी तीन शतकं झळकावली. मुंबईसाठी खेळताना लिस्ट ए सामन्यात त्याने ३३ सामन्यात १५२६ धावा केल्या आहेत. यशस्वीने १९ टेस्ट, एकमेव वनडे आणि २३ ट्वेन्टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. गोव्याकडून खेळताना कर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते हा मुद्दाही महत्त्वाचा आहे.