घरगुती सामन्यांमध्ये दमदार प्रदर्शन केलेला मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणाची संधी मिळाली. मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात त्याने पदार्पण केले खरे, मात्र, त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. तिसऱ्या सामन्यात त्याला बाहेर बसवण्यात आले. या सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे फलंदाजीच्या डिपार्टमेंटमध्ये सखोलता आणण्यासाठी त्याला चौथ्या टी-20साठी संघात आणण्यात आले. यावेळी त्याने फलंदाजीला येत पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आहे.
इंग्लंडच्या गोलंदाजीचा बाण समजल्या जाणाऱ्या जोफ्रा आर्चरला सूर्यकुमारने अस्मान दाखवले. ताशी 140 किमी टाकले्ल्या चेंडूवर सूर्यकुमारने नटराजन स्टाइलने षटकार खेचला. त्याचा हा अंदाज पाहून टीम इंडियाचे खेळाडूही आनंदित झाले. सुरुवातीच्या पडझडीनंतर सूर्यकुमारने संघाला आधार देत वैयक्तिक अर्धशतक झळकावले. त्याने 28 चेंडूत आपल्या 50 धावा पूर्ण केल्या.
मागील सामन्यात पराभव झाल्याने विराटसेनेला मालिका वाचवण्यासाठी या सामन्यात विजय आवश्यक आहे. इंग्लंडने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली असून मालिका जिंकण्याच्या उद्देशाने ते मैदानात उतरतील.
कोण आत कोण बाहेर?
आजच्या सामन्यासाठी ईऑन मॉर्गनने संघात कोणताही बदल केलेला नाही. भारतीय संघात मात्र दोन बदल करण्यात आले आहेत. दुखापतग्रस्त इशान किशनच्या बदली सूर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. तर, फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलच्या जागी जलदगती गोलंदाज राहुल चहर संघात आला आहे. भारताच्या गोलंदाजांच्या फळीत चहल दोन्ही पराभूत सामन्यांत महागडा ठरला होता.