Suryakumar Yadav Statement on India Series Win: भारताने बांगलादेशविरूद्ध तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना मोठ्या फरकाने जिंकला. या सामन्यात बांगलादेशचा १३३ धावांनी पराभव करून भारताने ही मालिका ३-० ने जिंकली. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला. भारताने प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या १११ धावा, सूर्यकुमार यादवच्या ७५ धावा आणि या दोन्ही खेळाडूंच्या रेकॉर्डब्रेक १७३ धावांच्या भागीदारीसह विक्रमी २९७ धावा केल्या. या विजयानंतर संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या.
भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर आणि मालिका विजयावर बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “एक संघ म्हणून आम्ही खूप काही साध्य केलं आहे. मला या संघात निस्वार्थी क्रिकेटपटू हवे आहेत. जसं हार्दिकने सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला मैदानावर, मैदानाबाहेर असतानाही एकमेकांच्या यशाचा आनंद घ्यायचा आहे. आम्ही सर्वच एकमेकांबरोबर खूप वेळ घालवतो आणि मैदानावर खेळतानाही आम्ही याचा आनंद घेतो.”
भारताच्या मालिका विजयानंतर कर्णधाराचे मोठे वक्तव्य
पुढे बोलताना सूर्या म्हणाला, “संघाच्या मिटिंगमध्ये किंवा चर्चा करतानाही हा विषय असतो आणि गौती भाई (गौतम गंभीर) नेही मालिकेच्या सुरूवातीला आणि श्रीलंका दौऱ्यावर होतो तेव्हाही हेच सांगितलं होतं की, संघापेक्षा कोणीही मोठं नाही. तुम्ही ९९ वर खेळताय किंवा ४९ वर खेळताय पण जर तुम्हाला वाटलं या चेंडूवर मोठा फटका खेळून चेंडू सीमारेषेपलीकडे पाठवायचा आहे तर तुम्हाला तसे शॉट मारायला यायला हवेत आणि संजूने नेमकं तेच केलं, मी त्याच्यासाठी खूप जास्त आनंदी आहे. या मालिकेत सर्वांनी जशी कामगिरी केली आहे, ती वाखणण्याजोगी आहे. प्रत्येकाने आपलं योगदान देणं गरजेचं आहे.”
हेही वाचा – SL W vs NZ W: न्यूझीलंडच्या विजयाने टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, सेमीफायनल गाठण्यासाठी आता फक्त एकच मार्ग!
सूर्यकुमार यादवला पुढे विचारले गेले की, कोणत्या विभागामध्ये खेळाडूंना अजून सुधारणा करण्याची गरज आहे असं तुला वाटतं, यावर सूर्या म्हणाला, “जशी कामगिरी करत आलो आहोत, तशीच कामगिरी मैदानात सामना खेळताना कायम ठेवली पाहिजे आणि सातत्याने अशीच कामगिरी केली पाहिजे.”
भारताकडून वेगवान गोलंदाज मयंक यादवने ३२ धावांत दोन आणि फिरकीपटू रवी बिश्नोईने ३० धावांत तीन विकेट घेतले. यासह रवी बिश्नोईने टी-२० क्रिकेटमध्ये ५० विकेट्सचा टप्पा गाठला आहे. बांगलादेशकडून तौहीद हृदयने ४२ चेंडूत ६३ धावा केल्या आणि लिटन दासने २५ चेंडूत ४२ धावा केल्या. मात्र बाकीचे फलंदाज मोठी कामगिरी करू शकले नाहीत. तत्पूर्वी भारताने टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली. भारताने २०१९ मध्ये डेहराडूनमध्ये आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तानने केलेल्या तीन विकेट्सवर २७८ धावांची धावसंख्येला मागे टाकलं. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सांघिक धावसंख्येचा विक्रम नेपाळच्या नावावर आहे ज्याने ३१४ धावा केल्या होत्या.