Suryakumar Yadav Flashback 2022: टी २० विश्वचषकासह मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये २०२२ हे वर्ष खऱ्या अर्थाने सूर्यकुमार यादवचे वर्ष ठरले होते. टीम इंडियाच्या अनेक पराक्रमी सामन्यांमध्ये सूर्याची बॅट तळपली होती. द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सूर्याने सांगितले की, २०२२ मध्ये असे काही शॉट्स होते जे खेळल्यावर मला स्वतःला मी हे कसं केलं यावर विश्वास बसत नव्हता. सूर्याने यंदाचं टी २० विश्वचषकात अनेक विक्रम मोडीत काढले पण त्या सर्व पराक्रमी सामान्यांपेक्षा भारताचा दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध झालेला पराभव सर्वात अविस्मरणीय खेळ असल्याचे सूर्याने सांगितले आहे.
सूर्यकुमार यादवने सांगितले की, जे शॉट्स आपण देशांतर्गत सामन्यांमध्ये किंवा आयपीएलमध्ये सहज खेळू शकतो तेच शॉट्स आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जसे की विश्वचषकात खेळणे अत्यंत कठीण असते. पण जेव्हा मला हे शॉट्स २०२२ च्या विश्वचषकात खेळता आले तेव्हा मी स्वतः थक्क झालो होतो. सोशल मीडियावर मी मागच्या तीन महिन्यातील स्वतःचेच शॉट्स जेव्हा पाहिले तेव्हा मला प्रश्न पडला की मी हे कसे खेळू शकलो? मी हे कसं केलं?
सूर्यकुमार यादवसाठी अविस्मरणीय सामना कोणता?
रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२! जेव्हा ऑस्ट्रेलिया येथे झालेला भारत आणि दक्षिण आफ्रिका हा टी-२० विश्वचषक क्रिकेट सामना. ही आतापर्यंतची सर्वात आव्हानात्मक खेळी होती. खेळाआधी मी 15 मिनिटे नेटमध्ये बॅटिंग करायला गेलो आणि तिथेच मला पर्थचा अनुभव आला. सराव खेळपट्ट्या जलद होत्या. त्यामुळे मी फक्त १५ चेंडूंचा सामना केला आणि विकी पाजी (फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड) यांना सांगितले की मी आता थेट सामन्यातच खेळेन.
जेव्हा मी फलंदाजीला गेलो तेव्हा मी स्वतःला सांगितले की ही खेळपट्टी माझ्या विचारापेक्षा वेगवान आहे, जेव्हा मी नॉन-स्ट्रायकरला गेलो तेव्हा मी विचार करत राहिलो की मी कोणते शॉट्स खेळू शकतो कारण तिथेही बाऊन्स होते. संघ ५ बाद ४९ धावा असताना आमच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. आम्ही ७५ धावांवर सर्वबाद होऊ शकलो असतो, पण मी सकारात्मक मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि सामना खेळलो. जरी तो सामना आपण हरलो तरी तो माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता.
हे ही वाचा<< कोहलीने खेळ थांबवला, सूर्यकुमार यादवकडे गेला अन विचारलं “अरे यार तू Video… ” भरमैदानात नेमकं घडलं काय?
सूर्यकुमार यादव सामन्याआधी पाळतो हे नियम
दरम्यान, सूर्यकुमार यादवने याच मुलाखतीत आपण मैदानात जाण्याआधी नेमकं काय करतो याबाबतही सांगितलं. सूर्या म्हणाला की खेळाआधी मी डगआउट सामना पाहतो. मी टीव्ही अजिबात बघत नाही. मला सफलंदाजीला जाण्याआधी साधा वार्मअप करायला आवडतं. माझा हा प्रयत्न असतो की मी विकेट्सच्या दरम्यान वेगाने धावू शकेन यासाठी फलंदाजी आधीच शरीर गरम असणे आवश्यक आहे. असं असेल तरच तुम्ही पहिल्याच चेंडूवर तीन धावा पळून काढू शकता.