Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. या मेगा टूर्नामेंटसाठी भारतीय संघ पाकिस्तानात यावा, अशी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, संघ आणि संघाच्या चाहत्यांची इच्छा आहे, परंतु भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासाठी जाणार नाही. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, बीसीसीआयने आयसीसीला पत्र देखील लिहिले आहे की, आम्ही पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ खेळण्यास तयार नाही. आयसीसीने हे पत्र पीसीबीला पाठवले आहे. अशा स्थितीत पाकिस्तानच्या एका चाहत्याने सूर्यकुमार यादवला याबाबत विचारले असता, हे आमच्या हातात नाही, असे सूर्याने सांगितले.
पाकिस्तानी चाहत्याने सूर्याला विचारला प्रश्न –
वास्तविक, सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव बाहेर फिरताना दिसला. यावेळी तो काही पाकिस्तानी चाहत्यांना भेटला. त्यातील एका चाहत्याने सूर्यकुमार यादवला विचारले की, ‘तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही?’ या प्रश्नाच्या उत्तरात सूर्या म्हणाला की, ‘हे आमच्या हातात नाही.’ सूर्याचे हे विधानही योग्य आहे, कारण पाकिस्तानात जायचे की नाही हे बीसीसीआय आणि भारत सरकारला ठरवायचे आहे, पण निर्णय एकच असेल की भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात जाणार नाही.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही संधी आहे की, जर त्यांना संपूर्ण स्पर्धा मायदेशात आयोजित करायची असेल, तर ते टीम इंडियाशिवाय खेळू शकतात. परंतु हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आणि आयसीसीला हे जवळजवळ अशक्य आहे, कारण सध्या क्रिकेटची सर्वात मोठी बाजारपेठ भारत आहे आणि सर्वात मोठा ब्रँड टीम इंडिया आहे. भारताने या स्पर्धेतून माघार घेतल्यास या स्पर्धेचे बाजारमूल्य काहीच राहणार नाही. अशा परिस्थितीत हायब्रीड मॉडेलवर ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. ज्यात भारताचे सामने दुबईत होऊ शकतात.
सध्या भारताचा टी-२० संघ सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे, जिथे चार सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. आतापर्यंत या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. या मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसरा सामना यजमानांनी जिंकला आहे. त्यामुळे मालिका सध्या बरोबरीत आहेत. मालिकेतील तिसरा सामना १३ नोव्हेंबरला सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांना मालिकेत आघाडी घेण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे.