भारत आणि श्रीलंका संघात जानेवारीमध्ये टी-२० आणि वनडे मालिका खेळली जाणार आहे. यापैकी पहिल्यांदा टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या अगोदर भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादववर एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवला श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. ही माहिती त्याला कशी आणि कोणी दिली याचे रहस्य आता सूर्यकुमारने उघड केले आहे. सूर्यकुमारने असेही सांगितले की हे त्याच्यासाठी स्वप्नासारखे आहे, परंतु ते अतिरिक्त ओझे म्हणून घेणार नाही.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारख्या वरिष्ठ खेळाडूंना टी-२० संघात स्थान देण्यात आलेले नाही. मुंबईच्या सौराष्ट्र विरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सूर्यकुमार पत्रकारांना म्हणाला, “मला याची (उपकर्णधारपदाची) अपेक्षा नव्हती. मी एवढेच म्हणू शकतो की या वर्षी मी ज्या प्रकारे फलंदाजी केली. त्याचा हा पुरस्कार आहे. हे खरोखर चांगले वाटते आणि मी ही जबाबदारी घेण्यास उत्सुक आहे.”
सूर्यकुमारच्या वडिलांनी दिला सर्वात पहिल्यांदा निरोप –
जेव्हा त्याच्या वडिलांनी सूर्यकुमारला संघाची यादी पाठवली तेव्हा त्याला एकदाही विश्वास बसला नाही की त्याला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. तो म्हणाला, “मला माझ्या वडिलांकडून समजले, जे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्याने मला एक संक्षिप्त संदेशासह संघाची यादी पाठवली, कोणतेही दडपण घेऊ नको आणि तुझ्या फलंदाजीचा पुरेपूर आनंद घे.”
सूर्यकुमार म्हणाला, “मी क्षणभर डोळे मिटले आणि स्वतःला विचारले की हे स्वप्न आहे का? खूप छान भावना आहे.”
हेही वाचा – Ranji Trophy Cricket Tournament : सूर्यकुमारचे शतक हुकले
भारताचा टी-२० संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.