India vs Sri Lanka T20 ODI Series Squad Announcement :सूर्यकुमार यादव भारताचा नवा टी२० कर्णधार असणार आहे. भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी सूर्यकुमारकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. वनडे संघात कर्णधार रोहित आणि विराट कोहली हे अनुभवी शिलेदार आहेत. हार्दिक टी२० संघाचा भाग आहे. दरम्यान दोन्ही मालिकांसाठी शुबमन गिलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनातील हा पहिलाच दौरा असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूर्यकुमारने याआधीही भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. टी२० वर्ल्डकपविजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्माने फायनलनंतर या प्रकारातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. रोहितच्या बरोबरीने विराट कोहलीनेही टी२० प्रकाराला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे टी२०चं कर्णधारपद कोणाकडे असणार याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होत्या. हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवलं जाईल असे सुरुवातीचे आडाखे होते. मात्र फिटनेस आणि वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन सूर्यकुमारकडे टी२० संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.

सूर्यकुमारने ६८ टी२० सामन्यात २३४० धावा केल्या असून यामध्ये ४ शतकं आणि १९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा १६७.७५ हा स्ट्राईक रेट गोलंदाजांना धडकी भरवणारा आहे. सध्याच्या घडीला टी२० जागतिक क्रमवारीत तो दुसऱ्या स्थानी आहे.

नव्या कर्णधाराच्या चर्चांदरम्यान हार्दिक पंड्याच्या पोस्टने वेधलं लक्ष, फिटनेस दाखवत दिलं चोख प्रत्युत्तर?

दरम्यान कर्णधारपदी नसला तरी टी२० मालिकेसाठी हार्दिकची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. टी२० वर्ल्डकपविजेत्या संघातील ऋषभ पंत, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज यांचं पुनरागमन झालं आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी युवा संघ पाठवण्यात आला होता. त्या संघातील शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रायन पराग, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, खलील अहमद यांची श्रीलंका दौऱ्यातील टी२० संघात निवड झाली आहे.

रोहित शर्मा आणि गौतम गंभीरची कर्णधार म्हणून सूर्यकुमारच्या नावाला पसंती?

श्रीलंका दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी रोहित शर्माकडे सूत्रं असतील. रोहित आणि विराट या मालिकेत खेळणार नाही अशा बातम्या समोर येत होत्या. मात्र हे दोघेही संघाचा भाग आहेत. वनडे वर्ल्डकपमध्ये धावांची टांकसाळ उघडणारा श्रेयस अय्यर संघाचा भाग आहे. वनडे मालिकेसाठी हार्दिक पंड्याचा समावेश करण्यात आलेला नाही. वैयक्तिक कारणास्तव हार्दिकने या मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचं बोर्डाला कळवलं आहे. झिम्बाब्वे मालिकेत मालिकावीर ठरलेला वॉशिंग्टन सुंदर वनडे संघाचा भाग असणार आहे. आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केलेल्या रायन परागला वनडे संघात स्थान मिळालं आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे.

रोहित शर्मा

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यात तीन टी२० सामने आणि तीन वनडे खेळणार आहे.

टी२० संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रायन पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, खलील अहमद.

वनडे संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, के.एल.राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suryakumar yadav will lead india in t20 series in sri lanka series hardik loses vice captaincy shubman gill vice captain for both series virat kohli rohit sharma to play odi series