Mark Waugh on Suryakumar Yadav: २४ सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादवने चमकदार कामगिरी केली. त्याने मैदानाभोवती सर्व बाजूला चौकार-षटकारांची आतिषबाजी केली. त्याच्या खेळीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना घाम फुटला होता. “मिस्टर ३६०” अशी ओळख असणाऱ्या सूर्याने ऑस्ट्रेलियाला दिवसा तारे दाखवले. त्याने अवघ्या ३७ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या, ज्यामुळे भारताला ५० षटकांत ३९९ धावा करता आल्या, जी आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेमधील त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. सुर्याच्या या खेळीने ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मार्क वॉ खूप प्रभावित झाला. वॉने कबूल केले की जेव्हा सूर्यकुमार यादव क्रीजवर असतो तेव्हा विरोधी संघाच्या कर्णधाराला योग्य क्षेत्ररक्षण ठरवणे कठीण होते.
जिओ सिनेमावर भारतीय फलंदाजाच्या विस्फोटक खेळीबद्दल बोलताना वॉने सूर्याचे खूप कौतुक केले. तो म्हणाला की, “मैदानाची प्रत्येक दिशेला फटके मारण्याचे विलक्षण कौशल्य पाहून मी आश्चर्यचकित झालो. त्याने संपूर्ण मैदान कव्हर केले. सूर्यकुमारने तो किती सक्षम खेळाडू आहे हे अधोरेखित केले.” वॉ पुढे म्हणाला, “तो (सूर्या) पूर्णपणे इतरांपेक्षा वेगळा असून एक अद्वितीय फलंदाज टीम इंडियाला मिळाला आहे. ज्या भागात तो चेंडू मारतो त्याच भागात कुठल्याही संघाच्या खेळाडूला चेंडू मारताना मी पाहिलेले नाही. क्षेत्ररक्षक नसलेल्या ठिकाणी चेंडू मारणे हे त्याचे खरे कौशल्य आहे. हे सोपे वाटते परंतु करणे खूप अवघड आहे. तो नेहमी गोलंदाजाच्या डोक्यातील विचारांशी खेळतो म्हणूनच फील्ड कुठे आहे हे त्याला कळते. हे सर्व तो हाताळू शकतो आणि त्यातील गॅप शोधून फटके मारतो.”
इंदोरमधील एकदिवसीय सामन्यातील सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीने भारताचा माजी खेळाडू अभिषेक नायरही प्रभावित झाला. नायरच्या म्हणण्यानुसार, होळकर स्टेडियमची परिस्थिती सूर्यासाठी वरदान ठरली. १० षटकांपेक्षा कमी चेंडू शिल्लक असताना मोठ्या धावसंख्येचा टप्पा आधीच त्याने त्याच्या डोक्यात तयार केला होता. सहाव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून तो क्रिजवर आला, टीम इंडियाचे सर्व बॉक्सेस टिक झाले आहेत.”
२०२१ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून, सूर्यकुमार यादवने ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये टी२० फॉरमॅटमधील त्याचा फॉर्म इथे आणण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेच्या आधी, सूर्याने भारताच्या आशिया कप संघाचा भाग म्हणून श्रीलंकेचा दौरा केला. त्याने बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सुपर-४ सामन्यात ३४ चेंडूत २६ धावा केल्या होत्या. ३३ वर्षीय खेळाडूला आता एकदिवसीय क्रिकेटची गतिशीलता समजली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात त्याने ४९ चेंडूत चौथे एकदिवसीय अर्धशतक झळकावले होते. भारताचा या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना २७ सप्टेंबर रोजी राजकोट येथे होणार आहे.