भारतीय क्रिकेट संघाने बार्बाडोसच्या मैदानावर टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर लक्षवेधी विजय मिळवून भारताला तब्बल १३ वर्षांनी आयसीसी चषक मिळवून दिला. भारताचा संघ काल भारतात परतल्यानंतर कालपासून दिल्ली ते मुंबई असा चल्लोष सुरू आहे. काल मुंबईत मरीन ड्राईव्ह ते वानखेडे मैदान अशी अभूतपुर्व अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच आज विधीमंडळात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासह सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबेचा राज्य सरकारच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सूर्यकुमारने मराठीत भाषण करत असताना आमदारांनी सुर्या, सुर्या… असा जयघोष करत त्याच्या कामगिरीचे कौतुक केले.
आमदार प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत चारही मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्यता देत, आज केंद्रीय सभागृहात सत्काराची व्यवस्था केली होती. यावेळी आमदारांनी चारही खेळाडूंचे अनुभव जाणून घेतले आणि त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी बाकं वाजवून आणि घोषणा देऊन दाद दिली.
सूर्यकुमार यादव भाषणासाठी आल्यानंतर त्याने मराठीत भाषणाला सुरुवात केली. सूर्यकुमारचे नाव सूत्रसंचालकांनी घेताच सभागृहातील आमदारांनी सुर्या, सुर्या… असा जयघोष सुरू केला. सूर्यकुमार म्हणाला की, मी काल मुंबईत जे पाहिलं, ते कधीही विसरता येणं शक्य नाही. तसेच आजही सभागृहात मी जे काही पाहतोय, तेही कधीच विसरू शकत नाही. माझ्याकडे आज व्यक्त होण्यासाठी शब्द नाहीत.
यावेळी सभागृहात बसलेल्या आमदारांनी सूर्यकुमारला त्याच्या कॅचविषयी बोलण्यास सांगितले. आमदारांच्या विनंतीनंतर सूर्यकुमार म्हणाला की, कॅच माझ्या हातात बसला. त्यानंतर त्याने बॉल बाँड्रीच्या आत कसा फेकला? याची कृतीही करून दाखविली. “कालच्या विजयी मिरवणुकीत मुंबई पोलिसांनी जे काम केले, ते कुणीही करू शकत नाही. यापुढेही आम्हाला अशीच प्रेरणा देत रहा. यापुढेही आपण विश्वचषक जिंकू”, अशी भावना सूर्यकुमारने व्यक्त केली.
© IE Online Media Services (P) Ltd