रिओ येथे २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचे स्वप्न साकार करीन, असा आत्मविश्वास दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळविणारा मल्ल सुशील कुमार याने व्यक्त केला.
‘ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’ या संस्थेच्या पुणे शाखेस येथे शानदार सोहळ्यात प्रारंभ झाला. या निमित्त सुशील कुमार, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर एम.सी.मेरी कोम, संस्थेचा संस्थापक व जागतिक बिलियर्ड्स विजेता गीत सेठी, अखिल इंग्लंड विजेता बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण, मुख्य कार्यकारी अधिकारी व ऑलिम्पिक हॉकीपटू वीरेन रस्कीन्हा हेही या वेळी उपस्थित होते.
या वेळी सुशील कुमार म्हणाला, ‘‘आतापर्यंत बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर लंडन येथील ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविले होते. त्याचे श्रेय ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टने केलेल्या बहुमोल सहकार्यास द्यावे लागेल. आताही पुढील ऑलिम्पिकसाठी मला त्यांचे सहकार्य मिळणार आहे. त्याचा फायदा घेत ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे लक्ष्य मी साकार करीन. ’’
‘‘जागतिक स्पर्धेत भाग घेण्याची माझी इच्छा होती, मात्र यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आदी महत्त्वाच्या स्पर्धा असल्यामुळे मला व योगेश्वर दत्त आम्हा दोघांना जागतिक स्पर्धेला न पाठविता विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने घेतला,’’ असेही सुशील कुमारने सांगितले.

Story img Loader