भारतीय कुस्ती महासंघाला उत्तर देण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश

रिओ ऑलिम्पिक स्पध्रेसाठी भारतीय कुस्ती संघाचे प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी निवड चाचणीची मागणी करणाऱ्या सुशील कुमारच्या अर्जाबाबत निर्णय देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाला मंगळवारी दिला. त्यानुसार बुधवारी सुशीलला चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंग यांनी दिली. त्यामुळे सुशालला ऑलिम्पिक प्रवेशाच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

न्यायाधीश मनमोहन यांनी सुशीलच्या अर्जाबाबत क्रीडा मंत्रालय व कुस्ती महासंघाने प्रतिज्ञापत्र सादर करावे, असा आदेश दिला आहे. याबाबत पुढील सुनावणी २७ मे रोजी होणार आहे. तसेच केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेही याबाबत खुलासा करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.

‘‘जागतिक कुस्ती स्पर्धेत दुखापतीमुळे सुशीलला सहभागी होता आले नव्हते. त्यामुळेच नरसिंगला या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली होती. यादवने या स्पर्धेत कांस्यपदक मिळवत देशाकरिता ऑलिम्पिक प्रवेशिका मिळवली आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंना शासनाकडून आर्थिक सहकार्य केले जात असते. सुशीललाही ऑलिम्पिक तयारीसाठी केंद्र सरकारचे साहाय्य मिळत आहे. यादवने कांस्यपदक मिळवल्यानंतरही सुशीलला सरकारची मदत मिळत आहे,’’ असे सुशीलच्या वकिलाने न्यायालयात सांगितले.

सुशीलने आपल्या अर्जात म्हटले आहे की, ‘‘यापूर्वी दोन वेळा मी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले आहे. जर सरकार अजूनही मला मदत करीत आहे, तर ऑलिम्पिक प्रवेशिकेवर माझाच हक्क आहे. मात्र कुस्ती महासंघाने माझ्याबाबत कोणतीही सहानुभूती दाखवलेली नाही. जर त्यांनी निवड चाचणी लढत घेतली तर मी निश्चितपणे त्यामध्ये सहभागी होईन. महासंघाने नियमांचे पालन केलेले नाही.’’

महासंघाकडून बाजू मांडताना वकिलाने म्हटले आहे, ‘‘सुशील हा ६६ किलो वजनी गटात भाग घेत असतो. आता मात्र तो ७४ किलो गटात ऑलिम्पिक प्रवेशिकेबाबत दावा करीत आहे. ऑलिम्पिकइतकेच आव्हानात्मक असलेल्या जागतिक स्पर्धेतील ७४ किलो गटात नरसिंगने कांस्यपदक मिळवले आहे. ही कामगिरी खरोखरीच ऑलिम्पिक स्पध्रेपेक्षा आव्हानात्मक होती. नरसिंगबरोबर लढत खेळण्याबाबत सुशील टाळाटाळ करीत आहे. जागतिक स्पर्धेत सुशीलने भाग घेतला नव्हता. मात्र यादवने त्यामध्ये भाग घेत देशाचा नावलौकिक उंचावणारी कामगिरी केली आहे.’’

‘‘कुस्ती महासंघाने सुशीलबाबत निर्णय घेतला आहे का व त्याची माहिती सुशील याला कळवली आहे का?’’ असे न्यायालयाने कुस्ती महासंघाला विचारले. याबाबत त्यांच्या वकिलाने सांगितले की ‘‘महासंघाने जे काही निर्णय घेतले आहे, त्याची सर्व माहिती सुशीलला देण्यात आली आहे.’’

त्यांच्या या उत्तराबाबत न्यायालयाने सांगितले, ‘‘सुशीलने ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य व एक कांस्यपदक मिळवले आहे. त्याची ही कामगिरीदेखील देशासाठी अभिमानास्पद आहे. त्याने अर्जात दिलेली कारणे योग्य आहेत. त्याच्या अर्जाची दखल घेण्याची आवश्यकता आहे.’’

सुशीलच्या वकिलाने निवड चाचणी घेण्याची मागणी केली, तेव्हा न्यायालयाने सांगितले, ‘‘कोणत्याही निर्णयाने देशाचेच अधिक नुकसान होणार आहे. त्यामुळे याबाबत महासंघानेच योग्य तो निर्णय घेणे उचित ठरणार आहे.’’

Story img Loader