दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला पदक मिळवून देणारा मल्ल सुशील कुमार याचे यंदाच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताकडून पाठविण्यात येणाऱया संभाव्य खेळाडूंच्या यादीत नाव नसल्याने त्याने नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय कुस्ती महासंघाने गुरूवारी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱया खेळाडूंची यादी पाठवली. मात्र, या यादीत सुशील कुमारचे नाव नाही. सुशील कुमारऐवजी नरसिंह यादव भारताचे प्रतिनिधीत्व करणार असल्याचे सांगितले जात आहे.

ऑलिम्पिकचे तिकीट न मिळाल्याने सुशील कुमारने नाराजी व्यक्त केली. याबाबत सुशील म्हणाला ‘‘माझी यापूर्वीची कामगिरी पाहून मला या स्पर्धेत पुन्हा संधी द्यावी असा मी आग्रह धरत नाही. मात्र आम्हा दोघा मल्लांपैकी श्रेष्ठ कोण आहे हे प्रत्यक्ष लढत घेऊनच ठरवावे असे माझे मत आहे. नरसिंगने मिळवलेली प्रवेशिका ही देशासाठी आहे, कोणत्याही एका खेळाडूसाठी नाही. जर एका स्थानासाठी दोन दावेदार असतील तर नियमानुसार चाचणी घेतली पाहिजे. ही पद्धत केवळ आपल्या देशात नसून, अन्य परदेशांतही अशाच प्रकारे चाचणी घेतली जाते. विद्यमान विश्वविजेता व ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता जॉर्डन बुरोघ्स यालाही रिओ स्पर्धेसाठी चाचणीद्वारे जावे लागले आहे.’’
दुसरीकडे नरसिंग यादवने लास व्हेगास येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत कांस्यपद मिळवत भारताला ऑलिम्पिक प्रवेशिका मिळवून दिल्याने त्याने ऑलिम्पिकमधील समावेशावर आपला अधिकार सांगितला आहे.

Story img Loader