भारतीय कुस्ती महासंघाकडून मंगळवारी बैठकीचा प्रस्ताव
रिओ ऑलिम्पिकला भारतीय कुस्ती संघात सुशील कुमार किंवा नरसिंग यादव यांच्यापैकी कुणाची निवड करायची यावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाने मंगळवारी बैठक बोलावली आहे.
दरम्यान हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे आणि सुशीलने क्रीडा मंत्रालयाकडे दाद मागितली आहे. त्यामुळे सरकारच्या निर्देशानंतरच निवड चाचणी संदर्भात निर्णय घेतला जाईल असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी सांगितले.
ऑलिम्पिकमध्ये कोणते खेळाडू कोणत्या वजनी गटामधून खेळणार आहेत याची संभाव्य खेळाडूंची यादी भारतीय ऑलिम्पिक समितीला द्यावी लागते. या यादीमध्ये सुशील कुमारचे नाव नव्हते. यामुळे सुशीलच्या रिओवारीच्या आशा संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र ही यादी भारतीय कुस्ती महासंघाने पाठवलेली नाही तर संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेने पाठवलेली आहे. जेव्हा सर्व पात्रता फेऱ्या पूर्ण होतील त्यानंतर जागतिक संघटना ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंची यादी करणार आहे आणि ही यादी ऑलिम्पिक समितीला पाठवण्यात येईल, असे भारतीय कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी सांगितले होते.
दरम्यान, यादीत नाव नसल्याने सुशील कुमारने क्रीडा मंत्रालय तसेच भारतीय कुस्ती महासंघाला पत्र लिहिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशील याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. मात्र तूर्तास हे प्रकरण कुस्ती महासंघाच्या निवड समितीकडे सोपवण्यात येणार आहे.
नरसिंगने गेल्या वर्षी लास व्हेगास येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात कांस्यपदकासह रिओवारी पक्की केली होती. औपचारिकदृष्टय़ा नरसिंग रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र आहे. मात्र खांद्याच्या दुखापतीमुळे सुशील कुमार जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळू शकला नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा पदक पटकावण्यासाठी शर्यतीत असल्याने सुशीलने निवड चाचणी आयोजित करण्याची मागणी केली होती. या वादावर तोडगा काढण्यासाठी कुस्ती महासंघाने क्रीडा मंत्रालयाकडे धाव घेतली मात्र त्यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.

बबितावरील कारवाई मागे, ऑलिम्पिकला जाणार
कांस्यपदकाच्या लढतीमधून माघार घेतल्याबद्दल कारवाई करण्यात आलेल्या बबिता फोगटवरील कारवाई मागे घेतली जाणार आहे. त्यामुळे रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचा तिचा मार्ग मोकळा झाला आहे.आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने उत्तेजक सेवनाबद्दल मंगोलियाच्या सुमिया एर्देनचिमेगवर (५३ किलो) बंदीची कारवाई केल्यामुळे बबिता (५३ किलो) हिला ऑलिम्पिक प्रवेश मिळाला आहे. त्याचबरोबर रवींदर खत्री (ग्रीकोरोमन-८५ किलो) यालाही ऑलिम्पिकची संधी मिळाली आहे. ‘बबिताने मंगोलियातील पहिल्या जागतिक पात्रता स्पर्धेतील लढतीमधून माघार घेतली होती. ही लढत अनावश्यक असल्यामुळे व दमछाक होऊ नये म्हणून तिने ही कुस्ती खेळली नव्हती. या प्रकाराबद्दल तिने माफी मागितली आहे. तिची ऑलिम्पिक प्रवेशिका निश्चित झाल्यामुळे तिच्यावरील तात्पुरत्या बंदीची कारवाई मागे घेतली जाईल व तिला ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास परवानगी दिली जाईल. महासंघाच्या शिस्तभंग समितीस आम्ही तिच्यावरील कारवाई मागे घ्यावी असे सुचविले आहे. मात्र तिला पाठविण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर देणे तिच्यावर बंधनकारक आहे,’ असे भारतीय कुस्ती महासंघाचे सहायक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले.

Story img Loader