ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी अवघे ५ दिवस शिल्लक राहिलेले असताना, भारताचा कुस्तीपटू सुशील कुमारचं नावं अधिकृत संकेतस्थळावरुन आश्चर्यकारकरित्या गायब झाल्याचं समोर येतंय. बिजींग आणि लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीत पदकांची कमाई करणारा सुशील, राष्ट्रकुल स्पर्धेच्या ७४ किलो वजनी गटासाठी सर्वोत्तम दावेदार मानला जात आहे. त्यामुळे भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे अखिल भारतीय कुस्ती महासंघ आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेला या प्रकाराबद्दल जराही माहिती नव्हती. प्रसारमाध्यमांकडून माहिती मिळाल्यानंतर, घडलेला प्रकार स्पर्धा आयोजन समितीच्या लक्षात आणून देणार असल्याचं कुस्ती महासंघाने स्पष्ट केलंय. हा प्रकार समजल्यावर सध्या जॉर्जियात असणाऱ्या सुशीलने कुस्ती महासंघाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचंही समजतंय.

घडलेला प्रकार तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची शक्यता वर्तवत कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी, सुशीलवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ दिला जाणार नाही याची खात्री दिली. याचसोबत भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनीही सुशील कुमारसमोबत घडलेल्या घटनेची दखल घेत यावर लवकरात लवकर ठोस पावलं उचलली जातील असं आश्वासन दिलं आहे. ४ एप्रिलपासून राष्ट्रकुल खेळांना सुरुवात होणार आहे.

Story img Loader