दुखापतींमधून पूर्णपणे सावरले नसल्याने ऑलिम्पिक पदक विजेते सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त हे दोघेही मल्ल आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुशीलच्या खांद्याला, तर योगेश्वरच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. आशियाई स्पर्धा १८ ते २२ एप्रिल दरम्यान होणार आहे.
दुखापतीतून मी सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. गुडघ्याची दुखापतही बरी होत असून त्यामध्ये चांगलीच सुधारणा आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या सुरुवात होण्याच्या एक किंवा दोन दिवसांपूर्वी माझी तंदुरुस्ती चाचणी होणार आहे. या तंदुरुस्ती चाचणीचा अहवाल पाहून प्रशिक्षक आणि महासंघ माझ्या सहभागाबद्दलचा अंतिम निर्णय घेईल, असे योगेश्वरने सांगितले.
तो पुढे म्हणाला की, जर आशियाई स्पर्धेत मला सहभागी होता आले नाही तर राखीव खेळाडू म्हणून बजरंगची निवड करण्यात आली आहे. तो माझ्या ६० किलो वजनी गटात माझ्या जागी सहभागी होईल.
लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरने कांस्यपदकाची कमाई केली होती. तर सुशीलने रौप्यपदक पटकावले होते. योगेश्वरचा पहिला सामना २० एप्रिलला, तर सुशीलचा पहिला सामना २२ एप्रिलला होणार आहे.
याबाबत मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक विनोद कुमार म्हणाले की, ही स्पर्धा भारतात होणार असल्याने आमच्या हातात काही वेळ शिल्लक आहे. त्यामुळे सुशील आणि योगेश्वर यांच्या सहभागाबाबतचा अंतिम निर्णय स्पर्धेच्या पूर्वसंध्येलाही घेता येईल. सुशील दुखापतीतून सावरला असून त्याने सरावाची सुरुवातही केली आहे. सप्टेंबर महिन्यात विश्व अजिंक्यपद स्पर्धा असल्याने दुखापतीतून जर खेळाडू सावरले नसतील तर ते या स्पर्धेत उतरण्यासाठी तयार नसतील.

Story img Loader