ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सुशील कुमार याने जागतिक पदक मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही मौलिक सूचना दिल्या, त्यामुळेच मला जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळविता आले, असे संदीप तुलसी यादव याने सांगितले. त्याने बुडापेस्ट येथे नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत हे यश मिळविले.
‘‘जागतिक स्पर्धेत सुशील कुमारने दुखापतीमुळे माघार घेतली व मायदेशी परतण्यापूर्वी त्याने माझी भेट घेतली व या स्पर्धेत कशी लढत द्यायची याबाबत मार्गदर्शन केले. हेच मार्गदर्शन माझ्यासाठी प्रेरणादायक ठरले. सुशीलने सांगितल्याप्रमाणे मी क्षमतेच्या शंभर टक्के कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझे जागतिक पदकाचे स्वप्न साकार झाले. माझ्याकडून आणखी मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र उपांत्यपूर्व फेरीत मला निसटता पराभव स्वीकारावा लागला, अन्यथा मी अंतिम फेरीत स्थान मिळविले असते,’’ असे संदीपने सांगितले.
यादव याने ग्रीको-रोमन विभागात सर्बियाच्या अ‍ॅलेक्झांडर मस्कीमोव्हिक याच्यावर मात करीत ६६ किलो गटात तिसरे स्थान मिळवले. ‘‘कांस्यपदकावर मी समाधानी असलो, तरी आता माझे लक्ष्य आहे ते ऑलिम्पिक पदकाचेच. सुशील कुमार व योगेश्वर दत्त यांचा वारसा मला चालवायचा आहे. आशियाई स्पर्धेत मला खांद्याच्या दुखापतीमुळे भाग घेता आला नव्हता. त्याची खंत मला वाटत होती. आता जागतिक पदकामुळे मला खूप आनंद झाला आहे. जागतिक स्पर्धेपूर्वी पंधरा दिवसांचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते, त्याचा फायदा मला झाला,’’ असे यादवने सांगितले. 

Story img Loader