भारतीय कसोटी संघातील फलंदाज चेतेश्वर पुजारा आपल्या शांत आणि संयमी खेळासाठी ओळखला जातो. तोच पुजारा जर टी २० क्रिकेटमधील आक्रमक फलंदाजासारखा चौकार-षटकारांचा पाऊस पाडताना दिसला तर? इंग्लंडमध्ये ससेक्स आणि वारविकशायर सामन्या दरम्यान क्रिकेट चाहत्यांना हे दुर्मिळ दृश्य बघायला मिळाले. चेतेश्वर पुजारा गेल्या काही महिन्यांपासून ससेक्स क्रिकेट क्लबसाठी खेळत आहे. वॉर्विकशायरविरुद्धच्या सामन्यात त्याने एकाच षटकात २२ धावा फटकावल्या. पुजाराचे हे नवीन आक्रमक रूप बघून क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ससेक्सचा कर्णधार चेतेश्वर पुजाराने एजबस्टन येथे वॉर्विकशायर विरुद्धच्या ‘रॉयल लंडन वनडे’ चषकातील सामन्यात एकाच षटकात तीन चौकार आणि एक षटकारासह २२ धावा केल्या. वॉर्विकशायरचा गोलंदाज लियाम नॉर्वेलने टाकलेल्या ४५व्या षटकात पुजाराने ही कामगिरी केली. पुजाराने ७९ चेंडूत १०७ धावांची शतकी खेळी केली. पण, वॉर्विकशायरकडून ससेक्सला चार धावांनी पराभव स्वीकारावा लागल्याने त्याची ही खेळी व्यर्थ गेली.
प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊन वॉर्विकशायरने ३१० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ससेक्सने चांगली सुरुवात केली होती. पुजाराने सात चौकार आणि दोन षटकारांसह १०७ धावा केल्या. शेवटच्या दोन षटकांत ससेक्सला २० धावा आवश्यक असताना, ऑलिव्हर हॅनन-डाल्बीने ४९व्या षटकात पुजारावा बाद केले. त्यामुळे ससेक्सला चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
चेतेश्वर पुजारा एप्रिल आणि मे महिन्यात ससेक्स संघाकडून क्रिकेट खेळला. या काळात ससेक्ससाठी त्याने दोन द्विशतके आणि दोन शतके झळकावून इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन केले होते. कसोटी सामना संपल्यानंतर तो पुन्हा एकदा ससेक्स संघात सामील झाला आहे.