नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेतील हेप्टॅथलॉन प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिलेल्या स्वप्ना बर्मन हिच्या दोन्ही पायांना सहा बोटे आहेत. त्यामुळे तिच्या पायात नियमित बूट फारसे व्यवस्थित बसत नसूनही तिने देशासाठी सुवर्णमयी कामगिरी केली होती. तिच्या सहा बोटांच्या पायासाठी एका विख्यात कंपनीतर्फे ७ विशेष जोडय़ा तयार करण्यात येणार असून ते बूट लवकरच तिला देण्यात येणार आहेत.

जन्मत:च दोन्ही पायाला सहा बोटे असलेल्या स्वप्नाला त्यामुळे अधिक प्रभावीपणे धाव घेणे शक्य होणार आहे. हेप्टॅथलॉनमध्ये वेगाने धावण्याला सर्वाधिक महत्त्व असते. अशा परिस्थितीत पायातील बूट जर योग्य नसतील तर त्याचा कामगिरीवर परिणाम होतो. परंतु, विपरीत परिस्थितीतही स्वप्नाने दाखवलेले कौशल्य विशेष कौतुकास्पद असल्यामुळेच तिच्यासाठी हे विशेष बूट बनवण्यात येणार असल्याचे संबंधित कंपनीने म्हटले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले असले, तरी तेवढय़ावर मी समाधानी नाही. देशासाठी खेळताना ऑलिम्पिक पदक पटकावणे, हे माझे ध्येय असून त्या दृष्टीने मला या बुटांचा निश्चितपणे लाभ होऊ शकेल. माझ्या कामगिरीमध्ये ज्या गोष्टींनी सकारात्मक बदल घडणार आहेत, त्या प्रत्येक बाबी करण्यास मी प्राधान्य देत आहे.

– स्वप्ना बर्मन