Indian Men’s team wins gold medal in 50m 3P: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सहाव्या दिवशीही पदकांची घोडदौड कायम आहे. गुरुवारी भारताला नेमबाजीत सुवर्ण आणि रौप्य पदक मिळाले आहे. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतीय महिला संघाने रौप्यपदक जिंकले, जे सहाव्या दिवशी भारताचे पहिले पदक होते. यानंतर, पुरुष संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि ५० मीटर 3P मध्ये सुवर्णपदक जिंकले. नेमबाजीत भारताकडून उत्तम कामगिरी सुरूच आहे.

नेमबाजीत भारतीय पुरुष संघाची कमाल –

स्वप्नील कुसाळे, ऐश्वर्य प्रताप सिंग, अखिल शेओरन यांच्या पुरुष संघाने ५० मीटर रायफल ३पी स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. ईशा, दिव्या आणि पलक या महिला सांघिक त्रिकुटाने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात देशासाठी रौप्यपदक जिंकले. भारताने आतापर्यंत नेमबाजीत एकूण १५ पदके जिंकली आहेत. सुवर्ण जिंकण्यासोबतच पुरुष संघाने विश्वविक्रमही केला. भारतीय संघाने १७६९ गुण मिळवले. त्याचबरोबर चीनने १७६३ गुण मिळवून रौप्यपदक जिंकले. याशिवाय दक्षिण कोरियाने १७४८ गुणांसह तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले.

भारतीय महिला संघांने पटकावले रौप्यपदक –

महिला संघाबद्दल बोलायचे झाले, तर ईशा, दिव्या आणि पलक या त्रिकुटाने दुसरे स्थान पटकावत रौप्यपदक जिंकले. प्रथम क्रमांकावर राहत यजमान चीनने सुवर्णपदक जिंकले. भारतीय महिला संघाने पहिल्या फेरीत २८७, दुसऱ्या फेरीत २९१, तिसऱ्या फेरीत २८६, चौथ्या फेरीत २९३, पाचव्या फेरीत २८६ आणि सहाव्या फेरीत २८८ गुण मिळवले. पलकने वैयक्तिक १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. वैयक्तिकरित्या, ईशा सिंगने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्येही रौप्यपदक जिंकले.

हेही वाचा – VIDEO: विश्वचषकाच्या सराव सामन्यासाठी टीम इंडिया गुवाहाटीत दाखल, अक्षर पटेल ऐवजी संघाबरोबर दिसला रविचंद्रन आश्विन

भारताने आतापर्यंत पटकावले सात सुवर्णपदकं –

भारताने आतापर्यंतचे सातवे सुवर्णपदक जिंकले. या सुवर्णपदकासह भारत पदकतालिकेत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. काल भारत ६ सुवर्णपदकासह पदकतालिकेत पाचव्या स्थानावर होता. मात्र आता भारतीय संघाने उझबेकिस्तानचा मागे टाकत आणखी एक सुवर्णपदक जिंकले आहे. उझबेकिस्तानने आतापर्यंत ६ सुवर्णपदके जिंकली आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी सातत्याने शानदार होत आहे.