पीटीआय, चॅटॅरॉक्स (फ्रान्स)

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या आणखी एका नेमबाजाने बुधवारी अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेने ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात पात्रता फेरीत सातवे स्थान पटकावत ही कामगिरी केली. त्याचा सहकारी ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर मात्र ११व्या स्थानावर राहिल्याने त्याला आव्हान गमवावे लागले.

स्वप्निलने एकूण ५९० गुणांची कमाई केली. स्पर्धा प्रकारातील पहिल्या गुडघे टेकण्याच्या स्थितीतून स्वप्निलने १९८ (९९,९९) गुणांची कमाई केली. त्यानंतर प्रोन पद्धतीत १९७ (९८, ९९) आणि उभे राहून १९५ (९८, ९७) गुणांची कमाई केली. त्याच वेळी सहकारी तोमर अनुक्रमे १९७, १९९ आणि १९३ गुणांसह ५८९ गुण मिळवून ११व्या स्थानावर राहिला. या स्पर्धा प्रकाराची अंतिम फेरी गुरुवारी होणार आहे.

चीनचा लियु युकुन ५९४ गुणांसह आघाडीवर राहिला. नॉर्वेच्या जॉन हर्मन हेगचे ५९३ गुण झाले आहेत. युक्रेनचा सेरहिय कुलिश तिसऱ्या, फ्रान्सचा लुकास क्रीझ चौथ्या, सर्बियाचा लाझारा कोवासेविच पाचव्या स्थानावर राहिले. या तिघांचेही समान ५९२ गुण झाले होते. सर्वाधिक वेळा अचूक लक्ष्याचा भेद केल्याच्या संख्येनुसार त्यांची क्रमवारी निश्चित करण्यात आली. यात सेरहियने ४६, लुकासने ३५, तर कोव्हासेविचने ३३ वेळा अचूक लक्ष्याचा भेद केला. पोलंडचा टोमाझ बार्टनिक (५९०) सहाव्या, तर चेक प्रजासत्ताकचा जिरी प्रिव्रतस्की (५९०) आठव्या स्थानावर राहिला.

हेही वाचा >>>Umpire Injured : शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार मारल्यानंतर फलंदाजाच्या सेलिब्रेशनमुळे अंपायरला दुखापत, पाहा VIDEO

गेल्या वर्षी हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेत स्वप्निल अखिल शेरॉन, तोमर यांच्यासह सांघिक सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. जागतिक विजेत्या तेजस्विनी सावंतकडे प्रशिक्षण घेणाऱ्या स्वप्निलने गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत चौथे स्थान मिळवले होते.

नेमबाज नाही, तर धोनी स्वप्निलचा आदर्श

ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरी गाठणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळे एखाद्या नेमबाजाला नाही, तर भारताचा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आपला आदर्श मानतो. धोनीच्या मैदानातील शांत आणि संयमी स्वभाव शैलीचा आपल्यावर कमालीचा प्रभाव असल्याचे स्वप्निलने आपल्या पात्रता फेरीच्या कामगिरीनंतर सांगितले. योगायोग म्हणजे स्वप्निल धोनीप्रमाणे रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून नोकरी करतो. धोनी कारकीर्दीच्या सुरुवातीला रेल्वेत तिकीट तपासनिसाचीच भूमिका करत होता. कोल्हापुरातील कांबळवाडी गावातील २९ वर्षीय स्वप्निलला ऑलिम्पिक प्रवेशासाठी १२ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. ‘‘मला रेंजवर शांत आणि संयमी राहायला आवडते. मी फारसा बोलत नाही. अचूक नेमबाजीसाठी शांत आणि संयम या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच मी धोनीचा प्रचंड चाहता आहे. क्रिकेटच्या मैदानावर सामना सुरू असताना कितीही मोठे दडपण असले, तरी धोनीचा संयम सुटलेला कधीही पाहिला नाही. मलाही असेच राहणे आवडते,’’ असेही स्वप्निल म्हणाला.