भारताचा यष्टीरक्षक वृध्दिमान साहा प्रकरणावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया सातत्याने समोर येत आहेत. आता भारताचे दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज सय्यद किरमाणी यांनीही एक धक्कादायक विधान केले आहे. साहावर ज्याप्रकारे अन्याय झाला, तसाच अन्याय माझ्यावरही झाला, पण त्यावर कोणीही बोलले नाही, असे किरमाणी यांनी म्हटले आहे.
वास्तविक वृध्दिमान साहाला भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. यानंतर साहाने अनेक मोठे आरोप केले. संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने निवृत्ती घेण्यास सांगितले होते, असे तो म्हणाला होता. त्याचवेळी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीबाबतही साहाने प्रतिक्रिया दिली होती. यानंतर त्याने काही चॅट्स शेअर केले, ज्यामध्ये त्याला पत्रकाराने धमकावले होते.
याबाबत अनेक दिग्गजांनी साहाला पाठिंबा दिला. वीरेंद्र सेहवागसह अनेक क्रिकेटपटूंनी साहाने पत्रकाराचे नाव सांगावे, जेणेकरून त्याच्यावर कारवाई होईल, असे म्हटले होते. मात्र, साहाने नाव सांगण्यास नकार दिला.
हेही वाचा – भविष्यातील कर्णधार घडवण्याचे उद्दिष्ट -रोहित
१९८३च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य सय्यद किरमाणी स्पोर्ट्सकीडाशी झालेल्या खास संवादात म्हणाले, ”साहासमोर कडवे आव्हान आहे. आयपीएल आणि मर्यादित षटकांमध्ये चांगली कामगिरी करणारे अनेक युवा खेळाडू आहेत. साहा दु:खी आहे पण प्रत्येक क्रिकेटपटूला अशा प्रसंगातून जावे लागते. निवड समिती आणि संघ व्यवस्थापन खेळाडूंबद्दल काय विचार करतात हे आम्हाला माहीत नाही. माझ्यावरही अन्याय झाला पण त्यावर कोणी बोलत नाही.”
”हा वयाचा घटक आता खूप दिवसांपासून आहे. मी देखील याचा बळी होतो. त्यांनी सचिन तेंडुलकरलाही सोडले नाही, बरोबर? मला विश्वास आहे की एखादा खेळाडू तो तीस वर्षांचा असल्यापासून परिपक्व होतो. माझ्याप्रमाणेच, साहा जेव्हा त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर होता तेव्हा त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. आणि आपण फक्त क्रिकेटपटूंबद्दलच का बोलत आहोत? प्रशासकांचे काय?”, असा सवालही किरमाणी यांनी केला.
वृद्धिमान साहाने भारतासाठी ४० कसोटींमध्ये ३ शतकांच्या मदतीने १३५३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ३० पेक्षा कमी राहिली आहे, पण त्याने ९२ झेल आणि १२ स्टम्पिगसह विकेटच्या मागे १०४ बळी घेतले आहेत.