माजी विजेती सायना नेहवाल आणि समीर वर्मा यांनी लखनऊ येथे सुरु असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. पहिला गेम गमावूनही सायनाने दणक्यात पुनरागमन करत इंडोनेशियन प्रतिस्पर्धी खेळाडूचा पराभव केला. याआधी सायनाने 2009, 2014, 2015 साली स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं.
इंडोनेशियाच्या रसेली हार्टवानने 12-21 च्या फरकाने पहिला गेम जिंकत सायनाला चांगलाच धक्का दिला. मात्र दुसऱ्याच गेममध्ये सायनाने आपला खेळ सुधारत दणक्यात पुनरागमन केलं. उर्वरित गेममध्ये सायनाने रसेलीला डोकं वर काढण्याचीही संधी दिली नाही. 21-7, 21-6 अशा फरकाने दुसरा व तिसरा गेम जिंकत सायनाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
दुसरीकडे पुरुषांच्या स्पर्धेत समीर वर्माला विजयासाठी संघर्ष करावा लागला. समीरने इंडोनेशियाच्या चिको वारडोयोचं आव्हान 21-13, 17-21, 21-18 असं मोडून काढलं. सायना आणि समीर वर्मा यांची अंतिम फेरीत चीनी प्रतिस्पर्ध्याशी गाठ पडणार आहे. त्यामुळे अंतिम फेरीतलं हे आव्हान पार करण्यात दोन्ही खेळाडू यशस्वी होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.